Home कृषीजागर केंद्र पुरस्कृत “कापूस उत्पादकता अभियान (कपास कांती)” (MCP) अंतर्गत बाळापूर तालुक्यातील शेतकरी...

केंद्र पुरस्कृत “कापूस उत्पादकता अभियान (कपास कांती)” (MCP) अंतर्गत बाळापूर तालुक्यातील शेतकरी गटांकडून ऑनलाईन अर्ज मागविणे आहे.

महाराष्ट्र शासन
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, बाळापूर

बाळापूर: भारत सरकार व महाराष्ट्र शासनामार्फत सन २०२६-२७ या वर्षाकरिता केंद्र पुरस्कृत “कापूस उत्पादकता अभियान (कपास कांती)” (MCP) ही नवी योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. आधुनिक पीक उत्पादन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करून कापसाची उत्पादकता वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत बाळापूर तालुक्याला एकूण ८० शेतकरी गटांचे भौतिक लक्षांक प्राप्त झाले आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता तालुक्यातील पात्र शेतकरी गटांनी शासकीय नियमांचे पालन करून विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहे.
योजनेच्या प्रमुख अटी व पात्रता निकष:
• पात्रता: बाळापूर तालुक्यातील ३१ मार्च, २०२५ पूर्वी स्थापन व नोंदणी झालेले शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs) किंवा कृषी क्षेत्रातील नोंदणीकृत सहकारी संस्था या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
• निवड पद्धत: पात्र गटांची निवड MahaDBT (महाडीबीटी) पोर्टलवर “प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य” (First Come First Serve – FCFS) या तत्त्वावर केली जाईल.
• गटांची मर्यादा: प्रत्येक गटामध्ये किमान आणि कमाल २५ शेतकरी सभासद असावेत. तसेच एका गावातून एका पिकासाठी जास्तीत जास्त २ गटांची निवड करण्यात येईल.
• Agristack ID: लाभ मिळणाऱ्या सर्व शेतकरी सभासदांकडे ‘Agristack Farmer ID’ असणे अनिवार्य आहे.
• हमीपत्र: निवड झालेल्या गटांना विहित नमुन्यातील प्रपत्र-‘अ’ नुसार हमीपत्र देणे बंधनकारक राहील.
अभियानांतर्गत समाविष्ट प्रमुख घटक व तंत्रज्ञान प्रात्यक्षिके:
या योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या शेतकरी गटांच्या शेतावर १० हेक्टरच्या समूहात (क्लस्टर पद्धतीने) खालीलप्रमाणे कापूस पीक प्रात्यक्षिके राबवून निविष्ठा संचाचे (कीट) वाटप व अनुदान दिले जाईल:
१. सघन कापूस लागवड पद्धती (HDPS) प्रात्यक्षिके: ९० X १५ सें.मी. अंतरावरील लागवडीसाठी रु. १८,५००/- प्रति हेक्टर अनुदान. २. क्लोजर लागवड पद्धती (CS) प्रात्यक्षिके: ९० X ३० सें.मी. अंतरावरील लागवडीसाठी रु. १४,०००/- प्रति हेक्टर अनुदान. ३. एकात्मिक पीक व्यवस्थापन (ICM) प्रात्यक्षिके (आंतरपिके): मूग, उडीद, चवळी आंतरपिकांसह प्रात्यक्षिकांसाठी रु. ७,५००/- प्रति हेक्टर अनुदान. ४. स्थानिक पुढाकाराच्या बाबी (फ्लेक्झी घटक): कापूस उत्पादक गटांसाठी बायोचार युनिट (रु. १०,०००/- पर्यंत ५०% अनुदान) आणि कॉटन श्रेडर (४०% ते ५०% पर्यंत कमाल रु. ६०,०००/- ते ७५,०००/- अनुदान) हे घटक देखील समाविष्ट आहेत.
विशेष आवाहन: बाळापूर तालुक्यातील माविम (MAVIM) आणि आत्मा (ATMA) अंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व पात्र महिला आर्थिक विकास महामंडळाचे बचत गट व शेतकरी गटांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर तात्काळ आणि जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
अधिक माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी आपल्या गावातील संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
तालुका कृषी अधिकारी, बाळापूर

Previous articleअखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ: बुलढाणा पूर्व अध्यक्षपदी राजू पाटील घाटे कायम, बुलढाणा पश्चिम जिल्हा अध्यक्षपदी सागर पनाड यांची नियुक्ती*