Home Breaking News सारंगी-मिठापूर येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणारा जथ्था पकडला,

सारंगी-मिठापूर येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणारा जथ्था पकडला,

पोकलॅंड मशीन, हायवा टिप्पर, मोबाईल, स्कॉर्पिओ गाड्या आणि रोख रक्कम जप्त


प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांच्या पथकाची कामगिरी


परभणी ( आनंद ढोणे पाटील) जिल्ह्याच्या पूर्णा तालूक्यातील सारंगी-मिठापूर येथील गोदावरी नदी पात्रातील वाळू उपसा करण्याचा ठेका महसूल खात्याने एका व्यक्तीला सोडला होता. येथील नदी पात्रातून शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे वाळू उपसा न करता सदरील रेती ठेकेदार पोकलॅंड मशीन व्दारे बेसुमार रेती उपसा करुन नदी पात्रातील ज्या भागातील रेती उपसा करण्याची परवानगी दिली ते ठिकाण बदलून अन्य अवैध पात्रातील रेती उपसा करुन नदी पात्रात व पात्रा बाहेर जाणारे येणारे रस्त्यावर गोदावरी नदीच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा निर्माण करुन प्रवाह बदलून अवैधपणे नदी पात्रात फिरुन पाणी दूषित करुन शासनाने ठरवून दिलेल्या अटी शर्तींचा भंग करीत प्रमाणाबाहेर रेतीचे उत्खनन करुन शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यामध्य घट होईल याची जाणीव असताना गौण खनिज सबंधित नियमाचे उल्लंघन करत पोकलॅंड मशीनच्या साह्याने नदी पात्रातील रेती अवैध रित्या बेसुमार उपसा करीत त्याची चोरटी वाहतूक करीत असल्याची माहिती मिळताच गंगाखेड उपविभागाचे प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांनी आपल्या पथकासह सारंगी-मिठापूर येथील रेती घाटावर छापा मारुन ४ चार पोकलॅंड मशीन, ९ हायवा टिप्पर, २ स्कॉर्पिओ गाड्या, १४ मोबाईल, रोख रक्कम ३४४७०० रुपये असा एकूण १ कोटी ८८ लाख १६ हजार ७०० रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. सदर छापेमारी ५ जून २०२२ रोजी दुपारी १ ते ३ वाजे दरम्यान केली तर या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा हा जमादार सुर्यकांत केजगीर यांच्या फिर्यादीवरुन करण्यात आला आहे. संगनमत करुन अवैध रित्या रेती उत्खनन व चोरटी वाहतूक करणा-या हनुमंत मनोहरराव पौळ,रा फळा ता पालम, मावली घोरपडे, संदीप उत्तम ढगे रा कंठेश्वर, जिया पठाण, लिंबाजी तुळशीराम आव्हाड रा सायाळ ता पालम, यांच्यासह अन्य काही आरोपीवर गुरन ९१/२०२२ कलम ३७९,४३०,४३१,१८६,१२०(ब) भा. द. वी. सह कलम म. ज. महसूल अधि. १९६६ कलम ४८(७), पर्यावरण संरक्षण अधि. १९८६ कलम ३,१५(१), खाणी व खणिज अधि. १९८७ कलम २१ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास चुडावा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड हे करीत असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांनी परभणीचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक जयंत मिना यांच्या मार्गदर्शनाखाली सदर छापेमारीची कामगिरी यशस्वी केली असल्यामुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.

Previous articleथेंब..थेंब… पाण्यासाठी हिमायतनगर शहर वाशीयांची भटकंती. 👉 वास्तव
Next article🌹 झेप 🌹