Home कृषीजागर परभणी-हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या पाऊसाच्या प्रतिक्षेत

परभणी-हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या पाऊसाच्या प्रतिक्षेत

परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- मराठवाड्यातील हिंगोली-परभणी जिल्ह्यातील काही शेत शिवार भागात आद्रा नक्षत्राचा ब-यापैकी पाऊस पडला. त्याच पाऊसाच्या ओलीवर शेतक-यांनी खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद, ज्वारी आदी पिकाची पेरणी केली. त्याच बरोबर हळद पिकाची देखील मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली. यानंतर एक दोन वेळा साधारण पाऊस झाला तर काही भाग कोरडाच असल्याने तेथील पेरण्या रखडल्या आहेत. ज्या भागात खरीप पेरणी झाली तेथील शिवारात खरीप पिकाची धानं अंकूरुन नेमकीच जमीनी बाहेर निघताहेत. पाऊसाने दडी मारल्याने जमीनीतील ओलावा कडक उन्हामुळे हडकून जात आहे.

जमीनी कडक होऊन पृष्ठभागावर मातीची कठीण खपली होऊन बसल्यामुळे अंकूर रोपटे जमीनीतच नाशून जात आहे. उगवणशक्ती रोडावून सारी रानं भांड होताहेत.शेतकरी मोठ्या पाऊसाची प्रतिक्षा करीत असून आकाशात ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही. पाऊसा अभावी हळदीची उगवणशक्ती मंदावली आहे. अंकूरलेले सोयाबीन, तूर, मुग, उडीद, कापूस, ज्वारीची रोपटे खरपडे, पक्षी, मोर, गोगलगाय ही रानटी श्वापद कुरतडून टाकत आहेत. पाऊस पडत राहील्यास पिके जोमदार वाढतील. मात्र, वरुणराजाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर होत आहेत. आता शेतकरी मोठ्या पाऊसाच्या प्रतिक्षेत असून त्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. काही जाणकारांच्या मते आळंदी पंढरपूरची आषाढी वारी जत्रा परतल्या शिवाय पाऊस पडत नसते, असे भाकीत वर्तवल्या जात असल्यामुळे शेतकरी पून्हा चिंताक्रांत बनत आहेत.

Previous articleमा.मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्त गोर गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा
Next articleपावसाळा आला तरी महामार्गावर पुलांचे काम अपूर्णच !