Home Breaking News अकोल्यात ताकद असलेला नेता ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधलं, राष्ट्रवादीला धक्का

अकोल्यात ताकद असलेला नेता ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधलं, राष्ट्रवादीला धक्का

योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे हे राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेना ठाकरे गटात सहभागी

झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी मुंबईत ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटीची वेळ मागितली होती. त्यावेळी उभय नेत्यांमध्ये सेना प्रवेशाची चर्चा झाली. ठरल्याप्रमाणे हरिदास भदे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. दरम्यान हरिदास भदे भारिपकडून २००४ ते २०१४ या कालावधीत अकोला पूर्वचे आमदार होते. सुरुवातीला वंचित, काँग्रेस, पुन्हा वंचित त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलं. आता संकटात असलेल्या उद्धव ठाकरेंना बळ देण्याचा निर्णय भदे यांनी घेतला आहे.

मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हरिदास भदे यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं. यावेळी खासदार अरविंद सावंत, बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख, अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा प्रवेश सोहळा पार पडला. माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव नागे, धनगर समाज संघटनेचे पदाधिकारी लक्ष्मण सरोदे, पी.एच. डाबेराव, अंबादास नागे, साहेबराव पातोंड, मराठा ब्रिगेडचे योगेश बकाल आदींनी

अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे हे अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारिप-बहुजन महासंघ म्हणजे सध्याची वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर दोन वेळा निवडून आले होते. सन २००४ आणि २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते विजय झाले होते. सन २०१४ च्या निवडणुकीत सध्याचे भाजपचे अकोला पूर्वचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांच्याकडून भदे यांना पराभवाला समोरे जावे लागले. त्यानंतर २०१९ मध्येही ते पराभूत झाले. इथून वंचितमध्ये त्यांचे मतभेद झाले अन् बाळापूर मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्यासोबत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
परंतु आता त्यांचे मन इथेही रमले नाही. बळीराम सिरस्कार यांनी यापूर्वीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता हरिदास भदे यांनी देखील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. भदे आज मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात सहभागी झाले आहे.

अकोल्यात राष्ट्रवादीला धक्का, आधी सिरस्कार आणि आता भदे यांचा पक्षाला रामराम
बळीराम सिरस्कार हे भारिप बहुजन महासंघाकडून अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघात सलग १० वर्ष आमदार राहिलेत. सिरस्कार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारिपला (वंचित) सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळे ते अस्वस्थ होते. तेव्हा (महाविकास आघाडी सरकार कालावधी) राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी सत्तेत असल्यामुळे काहीतरी पदरात पडणार, या आशेवर असलेले माजी आमदार सिरस्कार यांची सत्ता गेल्यामुळे आशा मावळली. आता हरिदास भदे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले. अगोदर सिरस्कार अन् आता भदे यांच्या जाण्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का अकोल्यात बसला आहे

Previous articleसंपत्तीच्या वादातून काका-काकूने पुतण्याला संपवलं, बायको येण्याआधी अंत्यसंस्काराची तयारी; असा खेळला खूनी खेळ
Next articleकॉंग्रेसचा आंबेडकरांना पिढिजात विरोध…!!