ॲड.पुजा प्रकाश एन.M.A.L.L.B. M.A.J. C.M
तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असतांना राष्ट्र प्रगतीच्या नवनव्या श्रृंखला पार करत असतांना आपण व आपला समाज, समाजातील लोकं अधिकाधिक मागास कसे झाले याचे पाढे वाचून समाज मनामध्ये तेढ निर्माण करणारया पुढारयांची वाढती संख्या ही भारतीय राज्यघटनेच्या स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या तत्वास हरताळ फासणारी ठरत आहे, हे विश्वची माझे घर, विश्व बंधुत्वाच्या तत्वांचा गोडवा गाणारे आपण आज वर्तमानात मात्र या देशातील आपल्याच म्हणवणाऱ्या बांधवांना आरक्षणासारख्या मिळणाऱ्या सुविधा मुळे किती गलीतगात्र होत आहोत,याची प्रचिती आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असतांना यावि यासारखी दुर्दैवी बाब नाही, बालभारतीच्या अभ्यासास सुरुवात केल्यापासून सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी प्रार्थना करणारे आपण, आपल्याच म्हणवणाऱ्या सामाजिक, आर्थिक,धार्मिक, मनुष्य म्हणून नैसर्गिक जिवन नाकारणारया बहिष्कृत केलेल्या वर्ग समूहास आपलाचं बांधव म्हणून सामाजिक प्रतिनिधित्व मिळावे म्हणून दिल्या गेलेली सुविधा,याचा मुळ उद्देश मानवि मूल्यांकनाच्या तत्वावर आधारित त्या बांधवांचा सर्वांगीण विकास करुन त्यांना समृद्ध असलेल्या समाजाच्या बरोबरीने दर्जा प्राप्त करून देणे हे सरकारचे कर्तव्य तर होतेच पण बंधुत्व भाव या न्यायी दृष्ट्या देशातल्या व राज्यातील प्रत्येक व्यक्तीचं सुद्धा कर्तव्य होतं,या कर्तव्याला व विश्वबंधुत्व या तत्वास आपण जगलो नाहीचं पण जागलो सुद्धा नाही, आणि आजच्या काळात आपण एकेकाळी पुढारलेला समाज समूह आज मागास का झाला याचा जाब प्रशासन व सरकार ला विचारण्याऐवजी आमच्या समाजाचा मागास समूहात समावेश करा या मागणीसाठी आंदोलनावर आंदोलनं करत आहोत, झालेल्या आंदोलनाच्या विराट प्रभावामुळे शासनाने ऐतिहासिक विदाचा आधार घेऊन तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गातीलचं होतात पण प्रगत जात समूह प्रवर्गाच्या समूहात जगत होतात त्याच्यात सुधारणा करुन परत काहि लोकशाही व मानवतेच्या न्याय बंधुत्व व समतावादी तत्वांना चिरडून त्यांना मूळ मागास प्रवर्गात ढकलणे हेचं तंत्रज्ञानाच्या युगातील मानवी जीवनाच्या सामाजिक प्रगतीचं लक्षण समजायचं का? बरं एवढं करुनही जर संपूर्ण समाजाचा विकास होत नसेल तर याचा फायदा काय?
कारण ज्या समाजाला सामाजिक न्याय म्हणून आरक्षण मिळाले त्या समाजातील लोकांची आजची कौटुंबिक आर्थिक स्थिती काय? सामाजिक संपन्नताचा दर्जा काय?
यावर सखोल अभ्यास करणं अनिवार्य आहे,
कारण आरक्षण नावाच्या सूविधेमुळं समाजातील सर्व स्तरातील सर्व लोकांचा विकास होतो या भाबड्या समजूतीच्या आशेतुन आपण जेवढ्या लवकर बाहेर येऊ तेवढ्या लवकर आपल्या येणाऱ्या पिढ्यांचा उद्धार आपण करू शकू,
आरक्षण हे प्रतीनिधित्व आहे आणी मिळालेल्या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून समाजातील फक्त काही लोक यानांच त्याचा लाभ घेता येतो, ज्यांना सुविधांचा लाभ घ्यायला आला त्यांचं त्या समाजातील टक्केवारीचं प्रमाण काढलं तर ते विस टक्के पेक्षा अधिक असणार नाही,
आरक्षणाच्या नावाखाली घेतलेल्या सुविधा मधुन एवढ्याचं प्रमाणात लोकं समाज विकास साध्य होणार असेल तर आरक्षणाचं फलीत काय?
आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा उपयोग समाजातील किती लोकांना होणार, समाजातील किती लोक की संपूर्ण समाज विकसित होणार यावर मंथन करणं गरजेचं आहे, आरक्षणाच्या नावानं खूप मोठं ईप्सित साध्य करता येईल या भ्रमातून महाराष्ट्रीय जनतेने बाहेर यायला हवे, याउलट प्रत्येक समाजातील, घटकातील, प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी काय करावे, यासाठी लढा उभारला तर खरया अर्थाने प्रत्येक समाज व समाजातील प्रत्येक व्यक्ती समृद्ध स्वयंप्रकाशित स्वावलंबी होईल,
काही जण म्हणतात आम्हाला फक्त शैक्षणिक आरक्षण पाहिजे,पण शिक्षण घेऊन सरकारी नौकरयाचं उपलब्ध नसतील तर आरक्षणाच्या द्वारा मिळविलेल्या पदव्यांच काय करायचे, शिक्षण कशासाठी असा प्रश्न आपल्या समोर उपस्थित निर्माण झाला पाहिजे, शैक्षणिक प्रगती होऊनही जर बौद्धिक, आर्थिक,व सामाजिक उत्क्रांती होत नसेल तर घेतलेल्या शिक्षणाच्या पदव्यांचा उपयोग काय? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शैक्षणिक आरक्षण लागू झालं तरी त्याचा उपयोग समाजातील किती लोकांना होणार, याचाही सर्वकष सखोल विचार करावा लागेल, कारण ज्या समाजाला आरक्षण प्राप्त होते त्या समाजातील सर्वच लोकसमूहाचा विकास झाला असे नाही, यावर देशबांधव म्हणून आपण कधी विचार करणार आहोत,आज प्रत्येक जात समूह आमच्या जातीचा समूह आरक्षणा करीता आरक्षण प्रवर्गात समाविष्ट करा यासाठी जंग पछाडत आहे तर आरक्षीत प्रवर्गातील समूह हे आमच्यात वाटेकरी नको म्हणून विरोधात्मक जंग लढण्याचं आव्हान करत आहेत,
शेवटी मनुष्य म्हणून आपण एक होऊच शकणार नाही का ? सर्वांनी एकत्र येऊन नियोजन बद्ध उपक्रम तयार करून राष्ट्रातील संपत्तीचे सर्वांना समान न्याय पद्धतीने हक्कदार कसं बनवता येईल यावर विचार विनिमय करून सर्व घटकांतील प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण उत्कर्षाकरीता सर्वसमावेशक सामाजिकदृष्ट्या समाज कल्याणकारी राजवटीचं तत्व वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करणारयांच सरकार निर्माण झालं पाहिजे यासाठी पुढाकार घेऊन सरकारी तत्वावर सर्वांचा समग्र विकास होईल अशा धारणा चा पुरस्कार करणाऱ्या माणसांना आपण पुढाकार घेऊन निवडलं पाहिजे, तरचं येणाऱ्या काळात भविष्यात निर्माण होणाऱ्या पिढ्यांच भविष्य सुखकारक असेल,
अशा नवयान समन्वय संस्कृतीचा स्विकार न करता आपण समाजा समाजात, समाजातील जाती पोटजात समूहात अधिकाधिक शत्रूत्वांची भावना निर्माण करण्यात आघाडीवर आहोत, अशा एक कल्ली कफल्लक धोरणांमुळे काही लोक पुढारी म्हणून पुढे येतीलही,पण त्यांच्या या भ्रमिष्ट विचारांमुळे भविष्याच्या उष:कालात येणाऱ्या कित्येक पिढ्या गारद होतील,तेव्हा आरक्षणा सारख्या महत्वाच्या प्रश्नांची मांडणी करतांना त्याचे दिर्घकालीन पडसाद काय उमटणार? कसे असतील याचाही विचार होणे आवश्यक आहे,कारण ज्यां काही आरक्षित समाज घटकातील काही लोकांना आरक्षणामुळे खुप प्रगती साधता आली त्याच आरक्षीत जात समूहातील घटकातील एकूण समाविष्ट जातींचा अभ्यास केला तरअसे दिसून येते की, एकूण समाविष्ट करण्यात आलेल्या जातींपैकी एक दोन जातीतील लोकचं मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत, बाकीच्या उर्वरित जातींना त्याचा मागमूसही नाही आहे,
परिणामी सर्वोच्च न्यायालया सारख्या संस्थांना वर्गीकरण करून आरक्षणाची वाटणी करावी अशा निष्कर्षापर्यंत पोचून वर्गिकरणासारखा निर्णय द्यावा लागला,या निर्णयाचं स्वागत आहे,पण त्या निर्णयामुळे समाज मनात पुन्हा जातीय तेढ निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे त्याच काय,व भविष्यात हिच स्थिती इतर मागासवर्गीय प्रवर्गातील समूहा बाबत निर्माण होणार नाही याची शाश्वती हे आज आरक्षणा करीता लढणारी माणसं, होऊ पाहणारे पुढारी देतील का? भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांचा विचार करून आपणास सहिष्णू होउन सर्वसमावेशकता तत्वांचा स्विकार करून देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने प्रतीष्ठापुर्ण साक्षात जगण्याचा अधिकार कसा प्राप्त होईल यावर क्रांतीदायी कार्य करणं अनिवार्य व गरजेचं आहे, देशातील तरुणाईंनी भेद असलेल्या नितीचा धिक्कार करुन भेद विरहित निती निर्माण करण्याचा नियतीशी करार केला पाहिजे,असा करार ज्या कराराच्या माध्यमातून जनमनात देशातील प्रत्येक व्यक्तीत्व समृद्ध स्वयंप्रकाशित स्वावलंबी समताधिष्ठित होईल अशी सद्भावना निर्माण झाली पाहिजे,एक नवि भेद विरहित संस्कृती निर्माण झाली पाहिजे अशा तत्वांचा स्विकार करून तात्पुरत्या स्वरूपात काही घटकांना सुविधा उपलब्ध होउन भविष्यात जाती जातीत व जातीतील पोटजातीत तेढ निर्माण होईल, समाज घटकातील पिढीला दिर्घकालीन त्याचा काही उपयोग होणार नाही अशा आरक्षण व तात्पुरत्या सुविधा भोगी धोरणांचा धिक्कार करायला हवा,
विना आरक्षण स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय या चतुसुत्री चा पुरस्कार करुण देशातील धार्मिक द्वेष व जातीय भेद नाकारून,
एकमेकांच्या जातीय प्रवर्गातील समावेशाच्या विरोधास त्यागून,सर्वजंनाच्या प्रगतीच्या पथावर आरुढ व्हावं लागेल तरचं भारत हा विश्वबंधुत्व व हे विश्वची माझं घर या महान मानवतावादी तत्वाचा पुरस्कर्ता आहे याचा परिचय देशवासीयांना व सर्व जगवासीयांना होईल.
अशा वर्तनाचा वस्तुपाठ घालून जगात आदर्श निर्माण करु.



