Home Breaking News कृषी मंत्र्याचा परभणी जिल्ह्यावर दुजाभाव!

कृषी मंत्र्याचा परभणी जिल्ह्यावर दुजाभाव!

सरसकट शेतक-यांना अतिवृष्टी अनुदान नाही!!
—————–
परभणी, (आनंद ढोणे) : या वर्षी जुलै २०२२ च्या महिन्यात सातत्याने दिर्घकाळ अतिवृष्टी होवून सखल क्षेत्रातील सोयाबीन, ज्वारी, मुग, उडिद ही पिके बाधित होऊन उध्वस्त झाली.यानंतर ऑगस्ट महिन्यात १६ ते २८ दिवस पावसाने खंड दिल्याने उंचवट्याच्या जमीनीत अतिवृष्टीचा सामना करीत धग धरुन राहीलेले हलक्या क्षेत्रातील सोयाबीन पीक होरपळून गेले.दरम्यान,राज्यात अतिवृष्टी झाली म्हणून शेतक-यांना तूर्तास आधार मिळावा म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने पूर्वीपेक्षा दुप्पट हेक्करी १३६०० रुपये जिरायती कोरडवाहू करीता अतिवृष्टी आनूदान जाहीर करुन तीन हेक्टरपर्यंत मर्यादा वाढवली.यावरुन सर्व शेतक-यांनी शिंदे सरकारच्या निर्णया बद्दल आनंद व्यक्त केला.परंतु, या सरसकट अतिवृष्टी आनुदानातून परभणी जिल्ह्याला तिलांजली दिल्याचे समजताच शेतकरी पून्हा सरकारच्या नावाने बोटे मोडू लागली.प्रशासनाने केवळ नदी नाल्या काठच्याच क्षेत्राचा समावेश केला. त्यातुनही बरेच शेतकरी वंचित ठेवले. त्यामुळे शेतकरी एकसंघ होऊन त्यांनी पूर्णा तहसीलदार व जिल्हाधिकारी परभणी यांना सरसकट अतिवृष्टी आनूदान व पिक विमा नुकसान भरपाई मदतीकरीता शेकडो शेतक-यांनी निवेदने सादर केली.

शिवाय,स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार शेतकरी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा कचेरीवर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढून सरसकट अतिवृष्टी अनुदान, पिक विमा मिळण्यासाठी व ऊस प्रश्नी आंदोलन छेडले. तसेच पूर्णा येथे प्रहार जनशक्ती संघटनेने देखील हजारो शेतक-यासह भव्य बैलगाडी मोर्चा काढला होता.या व्यतिरिक्त अनेक शेतकरी संघटना अजूनही मागणी करीत आहेच.असे असताना २४ सप्टेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे विद्यमान कृषी मंत्र्याचा परभणी जिल्ह्यात दौरा आला.त्यांनी परभणी शहरात, पूर्णेत येवून कार्यकर्ता मेळावाही घेतला. त्याचबरोबर येताना रोडच्या आजूबाजूची पिके पाहीली. काही शेतकऱ्यांना भेटी दिल्या.तसेच रस्त्यात ताफा थांबवुन ठाकरे गटाचे शिवसैनिक व पदाधिकारी यांचे व प्रहारच्या कार्यकर्त्याचे निवेदने स्विकारुन हसण्या शिवाय काही सुतोवाच केले नाही. पूर्णेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पावसाच्या खंडाने तेहतीस टक्यांपेक्षाही अधिक प्रमाणात सोयाबीन पिके बाधित होऊनही आनूदान विषयावर परभणी जिल्हा व पुर्णा तालुका दुष्काळ जाहीर करुन अनुदान देवू, असे सुतोवाच न केल्याने कृषी मंत्र्यांनी परभणी जिल्ह्यावर दुजाभाव केला असल्याचे पाहुन कार्यक्रमास ग्रामीण भागातून आलेल्या शेतक-यानी सरकारला काळजी नाहीच,असे बोलून दाखवले.आलेल्या शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्याचे बोलतील असे वाटले होते. पण तसे ऐकावयास मिळालेच नाही. शेजारच्या नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट अनुदान मिळते तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोणते पाप केले? असे शेतकरी रागाने बोलुन दाखवत आहेत. गत वर्षीच्या सरकारने सरसकट दुष्काळी अनुदान दिले होते. आता तर शिंदे-फडणवीस सरकारला केंद्र सरकारची भरपूर साथ असताना परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनूदानापासून का वंचित ठेवले?केवळ नदी नाल्या काठच्या बोटावर मोजण्याईतक्या शेतकऱ्यांना समाविष्ट करुन ईतर सरसकट शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्या.फक्त पंचवीस टक्के अग्रीम पिक विमा नुकसान भरपाई कंपनी देणार म्हणुन कोपराला गुळ लावुन चाटत बसायला लावले असल्याने परभणी जिल्ह्यातील शेतकरी शेतकरी नाराज झाल्याचे पहावयास मिळत आहेत.

प्रतिक्रिया
————

नरेश जोगदंड पाटील
उपजिल्हा प्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष, पूर्णा परभणी.
आम्ही अनेक वेळा पूर्णा तहसीलदार तथा तालुका व जिल्हा महसूल, कृषी अधिका-यांना निवेदने देवुन परभणी जिल्हा व पूर्णा तालुक्यातील शेतक-यांना सरसकट अतिवृष्टीचे अनुदान द्या म्हणून मागणी केली.यंदा अतिवृष्टी झाली त्यामुळे पिके बाधित झाली व मध्यंतरी पडलेल्या पावसाचा कोरडा खंड यामुळे सोयाबीन करपून गेली म्हणून सरसकट अनुदान देण्याची मागणी केली.तसेच पूर्णा तहसिलवर असंख्य शेतक-यासह भव्य बैलगाडी मोर्चाही काढला. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी कृषी मंत्री पुर्णा दौ-यावर आले असता त्यांना भेटून निवेदन देवुन अनुदान देण्याची मागणी केली. परंतु कोणतीही ठोस भूमिका घेऊन मंत्री महोदयांनी अनुदान देणारच म्हणुन सांगितले नाही.केवळ पाहू म्हणून सांगत बोळवण केली. यामुळे शेतकरी अजूनही अनुदान येईल म्हणुन प्रतिक्षाच करीत आहेत.

Previous articleशहराच्या श्री बाळादेवी मातेच्या शारदीय नवरात्रो उत्सवास सुरूवात
Next articleतालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांने वाचविले गाईंचे प्राण!