Home Breaking News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट

नितिन पाटिल प्रतिनिधी 

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी “राजगृह” या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानातील बाबासाहेबांच्या वस्तूंची पाहणी केली.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, खा.भावना गवळी, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना ऍड. आंबेडकर म्हणाले, इंदू मिल येथील प्रस्तावित स्मारकाबाबत मुख्यमंत्र्यांनसोबत चर्चा केली. २००३ ला संयुक्त राष्ट्रात (डरबन, द. आफ्रिका) सामाजिक अजेंड्यावर भारत सरकारला पराभव स्वीकारावा लागला होता. त्या परिषदेला मी उपस्थित होतो. सामाजिक मुद्द्यांवर ती परिषद झाली होती. त्यावेळी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी याबद्दल माझ्याकडे विचारणा केली होती. त्यावेळी मी त्यांना सांगितले होते की, भारताकडे आंतरराष्ट्रीय विश्लेषण करणारी कोणतीही संस्था नाही. केवळ परराष्ट्र खातं आहे. त्यामुळे जगाची जी अपेक्षा होती ती सरकारपर्यंत पोहोचली नाही. अशा प्रकारची संस्था उभी राहत नाही तोपर्यंत भारत सरकारचा पराभव होत राहील असे मी त्यांना सांगितले होते. त्याचवेळी पंतप्रधान वाजपेयींनी इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या नावाने आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्र उभारावे व त्याचा संपूर्ण खर्च केंद्रसरकार करेल अशा आशयाची नोट तयार केली.

त्या नोटची मी मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली. काँग्रेस,भाजपच्या काळात आतापर्यंत हे शक्य झालेले नाही. आपल्या कार्यकाळात आपण त्यासाठी प्रयत्न करावा असे त्यांना सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याची जबाबदारी मंत्री दीपक केसरकर यांना दिली. व पुढील आठ दिवसात अहवाल सादर करायला सांगितला. इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर उभं राहिलं अशी अपेक्षा ऍड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

Previous articleसंभापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वयेचा फलक लावण्यात यावा:-अजयसिंह राजपूत
Next articleगुडघाभर चिखलातून शेतकऱ्यांना जावे लागते शेतावर…..