Home Breaking News गुढीपाडवा

गुढीपाडवा

✍️ मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड

*वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा… उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा, गुढी पाडव्याच्या व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा*

*गुढीपाडवा का व कसा साजरा केला जातो?*

चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा किंवा कोणत्याही नवीन कामाचा आरंभ करण्यास हा मुहूर्त शुभ मानला जातो. गुढीपाडव्याला नवीन वर्ष म्हणून देखील ओळखले जाते. या दिवशी गुढी उभारुन नव्या संकल्पाचा शुभारंभ केला जातो. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय.

हाच वर्षांरंभाचासुद्धा दिवस असल्यामुळे खगोलीय गणितानुसारदेखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या सणाविषयी आपल्याला थोडफार माहिती असतेच, पण ही थोडीफार माहिती अधिक करण्यासाठी हा खास लेख आहे. चला तर जाणून घेऊया गुढीपाडव्याबद्दल माहित असायलाच हवी अशी माहिती!

गुढीपाडवा साजरा करण्याचे कारण
याचे उत्तर दडले आहे शालीवाहन राजवटी मध्ये! शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच *गुढीपाडवा* होय. शक सुरु करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. या दिवशी पंचाग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे. गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते. यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस. याच दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टीची निर्मिती केली म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे.

*गुढी कशी सजवतात?*
तसं तर प्रत्येक प्रांतानुसार गुढी सजवायची पद्धत वेगळी असते. पण सामान्यत: एक समान पद्धत सुद्धा दिसून येते. ज्यानुसार नवीन वर्षाचे स्वागत म्हणून एका उंच काठीला रेशमी साडी व भरजरी खण घेऊन त्याची घडी बांधली जाते. नंतर त्या काठीवर चांदीचा वा अन्य धातूचा तांब्या उपडा ठेवला जातो. आंब्याची पाने व कडूनिंबाची डहाळी देखील त्यावर बांधून गुढी अधिक सुंदर सजवली जाते. शेवटी फुलांचा हार आणि अत्यंत विशिष्ट अशी साखरेच्या गाठीची माळ चढवली जाते.

*विधिवत पूजा कशी करावी?*
अनेक जण गुढीपाडव्याच्या दिवशी या पेचात पडतात की गुढीची विधिवत पूजा कशी करावी. चला आज त्याची माहिती सुद्धा घेऊया. सुर्योदयापूर्वी गुढीपाडव्याचे अनुष्ठान केले जाते. या दिवशी पहाटे लवकर उठून तेलाने स्नान करण्याची प्रथा आहे. नंतर घरच्या मुख्य दारावर वरच्या बाजूस आंब्याची डहाळी लावावी आणि फुलांनी मुख्य दरवाजा सजवावा. दाराबाहेर रांगोळी काढून दिवे लावावेत. घराच्या दर्शनी भागात गुढी उभारण्यासाठी चांगली जागा निवडावी. गुढी कशी तयार करावी आणि सजवावी हे आपण वर जाणून घेतलं आहेच. गुढी उभारण्यापूर्वी ब्रम्हदेवाची पूजा केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची पूजा करावी.

*घरात गुढीपाडवा कसा साजरा करतात?*
गुढीपाडव्याला गुढी उभारून झाली की घरातील सगळे एकत्र जमतात. छान पारंपारीक वेशात सर्वजण नटलेले असतात. घरात गोडाधोडाचे जेवण असते. खास करून श्रीखंड पुरी किंवा पुरणपोळी हे दोन पदार्थ तर हमखास जेवणात दिसतात. पाहुणे सोयरे येतात आणि एकत्र कुटुंब जेवणाचा आस्वाद घेतात. नव्याने लग्न झालेल्या जोडप्याला गुढीपाडव्याला विशेष मान असतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुढीपाडवा हा मंगल आणि साडे तीन मुहुर्तांपैकी एक सण मानला जात असल्या कारणाने या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.
गुढीपाडवा हा सण केवळ महाराष्ट्रातच साजरा केला जातो असे तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण भारतभरात गुढीपाडवा साजरा केला जातो. पण साजरा करण्याची पद्धत आणि नाव मात्र वेगळे असते. आंध्रप्रदेश व कर्नाटक मध्ये याच दिवशी *उगादी* नावाने सण साजरा केला जातो. नवीन वर्षाचे स्वागत म्हणून अत्यंत हर्षोल्हासात दक्षिण भारतीय नागरिक हा सण साजरा करतात. सिंधी लोकं देखील याच दिवशी *चेटीचंड* नावाचा सण नवीन वर्षाचे स्वागत म्हणून साजरा करतात.

Previous articleबाबुराव कदम कोहळिकर आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्यात चुरस.
Next articleहिमायतनगर शहरात सावता परिषदेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी..