अकोला : राज्यातील मुख्य रस्त्यावर पोलीस प्रशासनाकडून पोलीस व्हॅन मध्ये कॅमेरा लावून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना रस्त्यावर दाखवलेले वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे कारण दाखवून अवाजवी इ चलान दंड सर्व महाराष्ट्रातील वाहन मालकावर टाकण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्व शहरातील ट्रॅफिक पोलीस यांच्याकडून टू व्हीलर, ऑटो, फोर व्हीलर वाहनाचे दुरून मागून फोटो काढून अवाजवी व इ चलान दंड वाहनावर टाकला जातो.
इ चलानच्या माध्यमातून मनमानी दंड आकारून सुलतानी वसुली तात्काळ बंद करा, ही मागणी जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला आघाडी अध्यक्ष आम्रपालीताई खंडारे, महासचिव संगीताताई अढाऊ यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.
1) मुख्य रस्त्यावर कॅमेरा पोलीस व्हॅनकडून वेग मर्यादा ओलांडल्याचे कारण पुढे करून देण्यात येणारे 2 हजार रुपये दंड अवाजवी असून 500 रुपये दंड करण्यात यावा व वेग मर्यादा ओलांडलेल्या वाहन थांबवून दंड करण्यात यावा.
2) कॅमेरा पोलीस व्हॅन रस्त्याच्या बाजूला झाडा झुडपात उभ्या केल्यामुळे अचानक वाहन चालकांना कॅमेरा पोलीस व्हॅन दिसून वाहन चालकाचे लक्ष विचलित होऊन अपघात होऊ शकतो, त्यामुळे रस्त्यावर बॅरिकेट लावून कॅमेरा पोलीस व्हॅन उभे करावे.
3) एकीकडे सरकारने हाय स्पीड वाहनांना परवानगी दिली आहे व मुख्य मार्ग पूर्वीपेक्षा उत्तम स्थितीत आहेत तरी वेग मर्यादा ही पूर्वीचीच आहे. त्यामुळे वेग मर्यादा वाढवून देण्यात यावी.
4) रस्त्यावर लिहिलेली वेग मर्यादेपेक्षा वाहन चालक 30% जास्त वेगाने चालत असल्यास दंड आकारण्यात यावा, अन्यथा दंड आकारू नयेत 30% जास्त वेग असणाऱ्या वाहनाचा जेवढा जास्त वेग त्या प्रमाणे दंड आकारण्यात यावा.
5) 1100 सी सीच्या वरील इंजन क्षमता असलेल्या वाहनांना 80 पर किलोमीटरच्या आत दंड आकारण्यात येऊ नये.
6) महाराष्ट्रातील मोठ्या शहरात इ चलन दंड करणारे मोटर व्हेईकल ॲक्टनुसार किमान ठरवून दिलेल्या दर्जाचे अधिकारी असावे.
7) महाराष्ट्रातील मोठ्या शहरात पोलिसांकडून कॅमेराच्या माध्यमातून वाहन चालकांना देत असलेल्या इ चलान दंड तात्काळ बंद करावा.
जनतेच्या भावनेचा विचार करून तात्काळ वरील मागणीप्रमाणे कारवाई करण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन कण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी प्रभाताई शिरसाट, सुनील फाटकर, गजानन गवई, मनोहर बनसोड, मंदाताई शिरसाट, अशोक सिरसाठ, लक्ष्मीताई वानखडे, मीनाताई बावणे, चरण इंगळे, अशोक दारोकार, गोरसिंग राठोड, डॉ धर्माळ, किशोर जामनीक, पराग गवई, नितीन सपकाळ, अजय शेगावकर, डॉ मेश्राम, संजय किर्तक, प्रदीप पळसपगार, सुयोग आठवले, संजय बुथ इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.