Home Breaking News राजकीय सामाजिक उत्तराधिकारीचं उत्तरदायित्व 

राजकीय सामाजिक उत्तराधिकारीचं उत्तरदायित्व 

ॲड.पुजा प्रकाश एन.M.A.L.L.B. M.A.J.C.M.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असतांना आपण राष्ट्र म्हणून एक होण्याऐवजी,प्रांतवाद, धर्मभेद, जातीयवाद,वर्ग,प्रवर्ग, या संकुचितवादी विचार श्रेणीत अधिकाधिक प्रमाणात अडकत आहोत, जातपात धर्म पंथ,वर्ग प्रवर्ग प्रांत भेद या भेदाचं जाळ आपल्या सभोवताली विणल्या जात आहे,आणी सर्वसामान्य लोक त्या जाळ्यात सहज अडकत आहोत,या मुळे आपल्या राष्ट्रीय एकात्मता या उदात्त व्यापक तत्वालाच आपण नख लावून त्याच्या नरडीचा घोट घेत आहोत का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे, आपण भारतीय म्हणून एक होवून बंधुत्व या महान मानवतावादी तत्वाचा स्विकार करुन जगण्याऐवजी आपापसात द्वेषमूलक तर्हेने जगण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत, आज आपण जातपात प्रवर्गातील समावेशाच्या धोरणांनेच आर्थिक उन्नती वा अवनती होईल या भ्रामक समजुतीत आपल्यातील बंधुत्व या महान संकल्पनेची विल्हेवाट लावण्यासाठी सरण रचत आहोत, राजकीय सत्तालोलूप पुढारी त्याला खतपाणी घालत आहेत, याचसाठी केला होता का महापुरुष व क्रांतीकारकांनी अट्टाहास स्वातंत्र्य,स्वराज्य व समाज सुधारणांचा,

परकीय सत्ता व साम्राज्यवादी तत्वांचा पुरस्कार करणाऱ्यांनी जेवढं भारतीयांना छळलं नसेल,लुटलं नसेल, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने आमचे स्वकीयचं भारतीय जनतेला म्हणजेचं आपल्या समस्त भारतीयांना छळत आहेत, फोडा आणि राज्य करा नितीचा वापर करत आहेत,या अशा विदारक परिस्थितीत,

मानवि दृष्ट्या विचार करून सर्वसमावेशक सामाजिकदृष्ट्या कल्याणकारी धोरणं आखणारया निष्ठावंत अशा सामाजिक, राजकीय विचारवंत व राजकीय कार्यकर्ते यांचा अभावाची दरी रुंदावत चालली आहे

आपण सजग राहिलो नाही तर मानवी समाजाच्या पिढ्यांच भविष्य काय असेल याच चित्र आपल्या डोळ्यासमोर यायला हवं

गेल्या एकोण ऐंशी वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून आपण नेमकं काय साध्य केले हे समजून घेतल्याशिवाय वर्तमानात वास्तविक रित्या जगणारया पिढीला व या पिढी द्वारा भविष्यात जन्माला येणाऱ्या पिढ्यांचा उद्धार करण्यासाठी काय करावे हे समजणार नाही, आज प्रत्येक जण नेता, कार्यकर्ता, राजकीय पक्ष , संघटना, मित्र मंडळं, जातीय सलोखा निर्माण करण्याऐवजी आपापसात वितूष्ट निर्माण करण्याचे कार्य करत आहेत, ब्रिटिश सत्तेने फोडा व झोडा निती वापरून साम्राज्य निर्माण केले व भारतावर राज्य केले असं आपण म्हणतो, त्यांनी विशिष्ट वर्ग समूहाच्या बाबतीत ही निती वापरली,पण आज युती आघाडी च्या सत्ताकारणात राजकीय क्षेत्रात सुधारणावादी नेतृत्वांचा आव आणणारे देशातील वेगवेगळ्या समूहाच्या लोकांना आपल्याचं प्रवर्गाच्या विरोधात लढवत आहेत, आज आरक्षणाच्या नावाखाली घेतल्या गेलेल्या निर्णयात सुधारणा करुन अंमलबजावणी करुन भविष्यात सर्वजंनाच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल कशी करता येईल सर्वांना समान संधी उपलब्ध होईल यावर उपाय करण्याचं सोडुन,

आज महायुतीचे समर्थक ओबीसी,एस.सी. एस. टी. मराठा,या प्रमुख जातवर्गासह उपजात वर्गातील लोकही, महाविकास आघाडीत असलेले ओबीसी एससी एसटी मराठा,याच प्रवर्गात असणारे लोक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत, सत्ताधिशांच्या पक्ष संघटनेत असलेले लोक निर्णयाच्या बाजूने तर

याचं प्रवर्गातील विरोधी बाकावर असलेले लोक सरकारी निर्णयाच्या विरोधात लाखोंचे मोर्चे काढून आपला विरोध दर्शवत आहेत,

परंतु खरया अर्थाने सामान्य माणसाच्या आयुष्यात सर्वांगीण प्रगती कशी आणता येईल यावर कोणीही बोलायला तयार नाही,

या देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने प्रतीष्ठापूर्वक जगता यायला हवे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्ती स्वावलंबी समृद्ध स्वयंप्रकाशित होउन त्यांच्या कर्तृत्व,व बौद्धिक सामर्थ्याच्या बळावर राष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेण्याकरीता त्यांच्या श्रमाचा सहभाग, वापर कसा करता येईल यावर मंथन व्हायला होवून या दिशेने लोकशाहीत वाटचाल व्हायला हवि,पण दुर्दैवाने आज असं होताना दिसत नाही,

आपण मानवतावादी तत्वाचा पुरस्कर्ता आहोत हे दाखवण्यात प्रत्येक जण पुढे आहे, पण माणुसकी तत्वांचा स्विकार प्रत्यक्षात दिसत नाही, एकाच जातीतील, धर्मातील, प्रवर्गातील माणसांना एकमेकांच्या विरोधात उभे ठाकत असाल,व राज्य करु पाहत असाल व हे तुमचं बेगडी राष्ट्रप्रेम आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असणारया शिक्षित म्हणवून घेणाऱ्या पिढीला ही लक्षात येत नसेल तर शिक्षित युवकांच्या बौद्धिक संपदेत किती वाढ झाली यावर सखोल विचार करून येणाऱ्या काळात तरुणाईला माणुस विरोधी तत्वांची भुरळ घालणाऱ्या बलाढ्य शक्तीशी वैचारिक, द्वंद्व सुरू करावाचं लागेल, वर्तमानात असणाऱ्या बेरोजगारी,भुकमरी, कुपोषण,शेतकरी आत्महत्या, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे वाढते प्रमाण,ओस पडणारी खेडे या व यासारख्या समस्यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या लागतील तरचं आपण व आपला देश महान होईल पण हे महानतेचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सृजनात्मक भाव ठेवून व्यापक दृश्यमान कार्य तरुणांना उभं करावं लागेल, रचनात्मक दिशेने वाटचाल करुन या समस्यांच समूळ उच्चाटन करावं लागेल,

ज्याप्रमाणे आपण आपल्या कौटुंबिक सामाजिक जिवनातील रुढी परंपरा पाळतो,

अगदी तशाच प्रकारे आपणास आपल्या विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करण्याच्या, विद्वानांनी ज्ञान दान करण्याच्या, समाज सुधारकांनी सुधारणा करण्याच्या, तपस्वीनी त्याग करण्याच्या, सत्ताधिशानी भोगवादी न बनता कल्याणकारी स्वराज्याच्या रक्षणासाठी सन्मानासाठी निरंतर कल्याणकारी धोरणं आखून प्रजेच्या हितासाठी, सुरक्षिततेसाठी, कल्याणासाठी एकवचनी, एकनिष्ठ असण्याच्या, व तत्वनिष्ठ असलं पाहिजे,हि भारतीय परंपरा आहे,ही परंपरा सुद्धा आपणास पुढे न्यावी लागेल, जनतेच्या कल्याणासाठी राज्यकर्त्यांनी, प्रशासकीय यंत्रणांनी,व न्याय व्यवस्थेने उदात्त, व्यापक असलं पाहिजे, जनहितार्थ राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पात उदारता,प्रमाणिकता असायला हवि हि आपली परंपरा आहे ती ही आपणास जोपासावी लागणार आहे,

भूतकाळात जे जे महान सृजन कार्य झालं त्या कार्याचं वर्तमानात जगणारया पिढ्यांनी त्याचा सखोल अभ्यास करून भविष्यात निर्माण होणाऱ्या पीढ्यांकरिता सृजनशील प्रगतीशील, विज्ञानवादी, तंत्रज्ञान युक्त तत्वज्ञान निर्माण करण्याचा वसा आपल्या खांद्यावर घेतला पाहिजे, हा वसा जर आपण पुढे वहन करणार नसु तर महापुरुष, क्रांतीकारक, समाज सुधारक ऋषीमुनींनी निर्माण केलेल्या कार्याचा पोकळ अभिमान बाळगण्यात,त्यांची भूषणें मिरवण्यात काहीही अर्थ नाही, आजची परिस्थिती निर्माण झालेली विदारक अवस्था पाहता आपणास व्यापक, उदात्त,उदार दृष्टिकोन ठेवून दृश्यमान असं कार्य शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक,तत्वज्ञान क्षेत्रात करावचं लागेल, माणुस म्हणून सर्वांना एक होवून स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय या चतुसुत्री चा पुरस्कारचं नाही तर प्रत्यक्षात स्विकार करावा लागेल,

मुलगा मुलगी, स्त्री पुरुष भेद न करता जबाबदारीपूर्वक समन्वयाचा स्विकार करावांच लागेल,असं म्हणतात मुलगी शिकली प्रगती झाली पण ती प्रगती मुलीची बाईमाणुस झाल्यावर त्या बाईत,त्या आईत प्रत्यक्षात दिसायला हवि,तरचं येणाऱ्या पिढ्यांचा उद्धार होईल, आज वर्तमान स्थितीत पालक ज्या प्रकारे आपल्या पाल्यांना वाढवत आहेत,सांभाळ करत आहेत हे पाहून मस्तीष्क रेखा सुन्न होत आहेत, आज शहरी निमशहरी भागात राहणारी पिढी आपल्या बालकांना ज्या लाडाकोडात वाढवत आहेत त्यामुळे भविष्यातील आव्हानांना ते सामोरे जातील असे खात्रीपूर्वक सांगता येणार नाही,

मुली च आईपणात रूपांतर झाल्यावर त्या माऊलीने शेळपट पोरं जन्माला घालू नयेत, त्यांना जगवायचं म्हणजेच त्यांना सर्व काही सोसता आलं पाहिजे, कठीणातील कठीण श्रम करता आले पाहिजे, भ्रष्टाचार,दुराचार, व्यभिचार,दलाली व भडवेगीरी सोडुन त्याला सगळं काही करता आलं पाहिजे, विद्वान होता आले पाहिजे, शास्त्रज्ञ होता आल पाहिजे, विशारद होता आल पाहिजे, नेता होता आल पाहिजे, समाज सुधारक होता आल पाहिजे, शोध, विद्वत्ता, विनम्रता, रचनात्मकता,त्याग करण्याच्या पंरपराचा आपला वारसा उदात्त होवून व्यापकपणे जपता आला पाहिजे,असे संस्कार मातृत्वाच्या अनमोल प्रेममयी कोनातुन देता आले पाहिजे, हे नाही देता आले तर कुस वांझोटी ठेवली तरी चालेल,

कुठे गेली ती माणसं ज्यांना देशातील मातीचा ,देशाचा,व माणसांचा अभिमान वाटायचा,सर्व वर्ग प्रवर्गातील समूहाच्या लोकाबाबत आपलेपणा वाटायचा, देशातील प्रत्येक व्यक्तीच्या उत्कर्षाकरीता राबावं असं वाटायचं वर्तमान स्थितीत त्या सर्व तत्वांनी थांबा घेतलेला दिसतो आहे,त्या थांबा घेतलेल्या तत्वांना आजच्या तरुणाईला गती देण्याची, उदात्त भव्य परंपरा जपण्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन समर्थपणे पार पाडावी लागेल,तरचं आजच्या सत्तापिपासू, फोडा आणि राज्य करा, जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या राजकीय, आर्थिक राक्षसी महत्त्वाकांक्षा असणारया, पुढारयांना लगाम बसुन, येणाऱ्या काळात जनहितदक्ष नेतृत्व निर्माण होउन भारत देश वास्तविकतेत महान, समृद्ध स्वयंप्रकाशित स्वावलंबी समताधिष्ठित होईल,व जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र व भारत घडेल.

Previous articleजलंब येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न
Next articleमहादेव मिरगे यांची भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड