Home Breaking News रिमझिम पाऊस पडे सारखा पैनगंगेचाही पूर चढे…पाणीच पाणी चोहीकडे…

रिमझिम पाऊस पडे सारखा पैनगंगेचाही पूर चढे…पाणीच पाणी चोहीकडे…

संततधार पावसामुळे कापूस – सोयाबीन पिके चिबाडून जाण्याच्या मार्गावर; तर पावसाच्या झाडीने नागरिक त्रस्त

हिमायतनगर, कृष्णा राठोड|
गत चार दिवसापासून हिमायतनगर तालुक्यासह परिसरात सुरु असलेल्या संततधार सुरूच असून, या पावसाने परिसरातील ओढे, पैनगंगा नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. भीज पावसाने जमिनीला खडा फुटला असून, शेतात जमा झालेल्या पाण्याने कापूस, सोयाबीन, ज्वारीसह इतर पिके चिबाडून जाण्याच्या मार्गावर आली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. एकूणच रिमझिम पाऊस पडे सारखा पैनगंगेचाही पूर चढे…पाणीच पाणी चोहीकडे… अशी स्थिती हिमायतनगर तालुक्याची झाली आहे.

गेल्या ४ दिवसापासून हिमायतनगर तालुक्यासह परिसरात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिकडं तिकडं पाणीच पाणी झालं आहे. थांबून थांबून पावसाचा जोर कमी अधिक होत असल्याने नदी – नाले, टाळावा, ओहळ तुडुंब भरून वाहू लागली आहेत. नाल्याच्या काठावरील शेतीच्या पिकात पाणी शिरत असल्याने अनेकांच्या जमिनी खरडून जात आहेत. या पावसाच्या रीपरिपमुळे खरीप हंगामातील मुग, उडीद, ज्वारी, कापूस, सोयाबीन हि पिके उन्मळून जात आहेत. त्यामुळे मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असून, पिक लागवडीसाठी केलेला खर्चही निघेल कि..? नाही या विवंचनेत बळीराजा आहे.

गत वर्षी झालेल्या पावसाच्या मानाने यावर्षी हिमायतनगर तालुक्यात जुलै महिन्यात पावसाची झाड लागली आहे. कधी मुरवनी तर कधी जोरदार पावसाचे ठोक पडत असल्याने जमिनीला खडा फुटला असून, विहिरी आणि बोअरच्या पाण्याची पातळी वादळी आहे. आणखी दोन दिवस पावसाची संततधार कायम राहिल्यास पिकांचे अतोनात मुकं होण्याची शक्यता बळावली आहे. कारण कोवळी पिके रानात डोलत असताना पावसाची संततधार ४ दिवसापासून सुरु आहे. वरील पातळीवर झालेल्या पावसाचे पाणी पैनगंगा नदी पात्रात येत असल्याने पैनगंगा नदी दुथडी भरून वाहते आहे.

सर्वत्र सुरु असलेल्या पावसाचे पाणी नदीत जाण्यासाठी मार्ग नसल्याने नदी व नाल्याच्या काठावरील गावकर्यांच्या घरात पाणी घुसत आहे. अनेक गावाकडे जाणारे ओव्हाळ तुडुंब भरून वाहत असल्याने हिमायतनगर – घारापुर सह इतर गावचा संपर्क तुटला आहे. सध्याच्या पावसाची परिस्थिती पाहता हिमायतनगर तालुक्याचा अतिवृष्टी ग्रस्त भाग म्हणून समावेश करून खरडून गेलेल्या जमिनी आणि कोवळ्या पिकांचे झालेल्या नुकसानीचा सर्वे करण्यात यावा अशी मागणी शेतकरी व नागरीकातून केली जात आहे.

थोडा वेळ थांबून जोराचा पाऊस पडत असल्यामुळे हिमायतनगर शहरानजीकचा नाडव्याचा नाला, घारापुरला जाणारा नाला यासह परिसरातील अनेक नाल्याला मोठ्या प्रमाणात पुर आल्याने अनेक गावचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पावसामुळे आठवडी बाजार ठप्प झाले असून, नागरिक व शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने, सहस्रकुंड धबधबा त्रीधारणी ओथम्बुन वाहत आहे. त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण पात्र भरून एकच धार धो धो कोसळत आहे. येथील उंच मानोऱ्यामुळे पर्यटकांना धबधब्याचा नैसर्गिक आनंद घेणे सुलभ झाले आहे. निसर्ग निर्मित धबधब्याचे हे विहंगम दृश्य बघून पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फिटत आहेत.

Previous articleहिमायतनगर ते बोरगडी मुख्य रस्त्याचे चालू  असलेले काम थातूरमातूर .,..
Next articleपुरांचे पाणी शेतात गेल्याने पिकांचे अतोनात नुकसान.