Home कृषीजागर ऊसाच्या उत्पादन वाढीकरीता ड्रोनने विद्राव्य निवीष्ठांची फवारणी करणे आवश्यक-पूर्णा सहकारी साखर कारखान्याने...

ऊसाच्या उत्पादन वाढीकरीता ड्रोनने विद्राव्य निवीष्ठांची फवारणी करणे आवश्यक-पूर्णा सहकारी साखर कारखान्याने केले प्रात्यक्षिक यशस्वी!


👆
संदीप देशमुख सहाय्यक ऊस विकास अधिकारी

परभणी, (आनंद ढोणे) :- मराठवाडा विभागातील नांदेड-परभणी-हिंगोली जिल्ह्यातील शेत शिवारास येलदरी-सिध्देश्वर धरणाच्या कालव्याचे पाणी बागायती पिकासाठी येत असल्याने व शिवाय शेतक-यांनी आपल्या शेतीत विहीर, बोअरवेल खोदून कायम पाण्याची व्यवस्था करुन घेतल्यामुळे तीनही जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊस पिकाची लागवड करतात. परंतू, शेतक-यांना तंत्रज्ञान अवगत नसल्याने या भागात केवळ ५० ते ६० टनापर्यंतच ऊसाचे एकरी उत्पादन निघत आहे. पश्चिम महाराष्ट्रात १०० पेक्षाही अधिक ऊसाचे उत्पादन तेथील शेतकरी काढत आहेत. त्यांना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांनी प्रथम उभारणी केलेले बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि नामवंत वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूट पूणे कडून वेळोवेळी मार्गदर्शन तंत्रज्ञान माहिती मिळत असल्याने ते शक्य झाले आहे. याच धरतीवर मराठवाड्यातील भागातही ऊसाचे एकरी उत्पादन अधिकाधिक वाढावे यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री,अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्ली,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मुंबई, अध्यक्ष इंडियन शुगर एक्जीम कार्पोरेशन लि, उपाध्यक्ष नॅशनल फेडरेशन ऑफ को-जनरेशन असोसिएशन दिल्ली. तथा पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या सहकार्याने त्यांच्या फार्म हाऊस जवळील ऊस पिकावर ड्रोनने ऊसावरील किडरोग नियंत्रण औषध व कृषी निविष्ठाचा वापर करुन उत्पादन वाढीकरीता नूकतेच १७ जुलै २०२२ रोजी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन फवारणी करुन प्रयोग प्रात्यक्षिक यशस्वी केला. हा प्रयोग मराठवाडा व विदर्भ विभागातील पहिलाच आहे. पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र हे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात विस्तारलेले असून सदर साखर कारखान्याचे असंख्य सभासद शेतकरी आहेत. या सभासद शेतक-यापैकी ज्या शेतक-यांनी हंगाम २०२२ मध्य ऊस लागवड केली आहे. किंवा खोडवा आहे. अशा ऊसाच्या उत्पादन वाढीकरीता ड्रोन व्दारे फवारणी केल्यास खालील फायदे होतात.
——–
* ऊस पिकावर मजुराव्दारे फवारणी करणे शक्य नसल्यामुळे ड्रोनव्दारे फवारणी करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. अंदाजे अपेक्षित ऊस उत्पादनामध्ये १० ते १५ टक्के वाढ होते. फवारणी करताना थेट संपर्क येत नसल्याने विषबाधा आणि कर्करोग होण्याची भीती नाही. फवारणी करीता पाणी १० लिटर लागते व रासायनिक निविष्ठा फवारणी खर्चामध्ये २० ते २५ टक्के बचत होते. ऊसाच्या कोणत्याही वयात फवारणी करणे शक्य आहे. ड्रोनने फवारणी केल्यामुळे सगळीकडे सारख्या प्रमाणात निवीष्ठांची फवारणी होते. ऊस पिकावर फवारणी केल्यामुळे पानाची प्रत सुधारते. त्याचा फायदा प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा वेग वाढवून पिकाची अन्नसंचयन करण्याची कार्यक्षमता वाढते. ऊस पिकावर फवारणी केल्यामुळे ऊसाच्या कांड्याची लांबी आणि कांडे जाडी सुधारते. त्यामुळे ऊस उत्पादनात वाढ होते. तसेच वेळेची बचत होते. ५ ते १० मिनीटात एक एकरची फवारणी होते.
ड्रोनने फवारणी करण्यासाठी पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या ईच्छूक सभासदांना त्यांच्या शेतातील उभ्या ऊसावर फवारणी करण्यासाठी एकरी ७०० रुपये खर्च येतो. त्यात कृषी निविष्ठाचा खर्च वेगळा असेल. तो असा आहे, एकरी (कोणतेही एक औषध) नामवंत वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूट पूणे येथे उत्पादीत केलेला वसंत ऊर्जा :- १ लिटर (२६३ रुपये), मायक्रोन्यूट्रिएंटस:- २.५ लिटर (४४७ रुपये), प्लांट हेल्थ:- १ लिटर (२६३ रुपये), नत्र स्फुरद पालॅश १५:१५:१५:- २.५ लिटर (४४७ रुपये)या पध्दतीने ड्रोनने फवारणी करण्यासाठी साखर कारखान्याच्या सभासदांनी पूर्णा सहकारी साखर कारखाना साईटवर रोख रक्कम भरल्यानंतर सबंधित सभासद ऊस उत्पादक शेतक-याच्या शेतात टिम जाऊन ऊसाची फवारणी करणार आहे. असे आवाहन पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी केले आहे.
———
ड्रोनव्दारे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन नामवंत वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूटमध्ये निर्मीत केलेल्या विद्राव्य कृषी निविष्ठाची ऊस पिकात शेतकरी सभासदांनी फवारणी केल्यास त्याचा उत्पादन वाढीकरीता निश्चित फायदा होणार आहे.तसेच किड व रोग नियंत्रणाकरिता देखील फायदा होणार आहे. त्यासाठी सर्व सभासद शेतक-यांनी ड्रोनव्दारे ऊसाची फवारणी करणे उपयुक्त ठरेल. संदीप देशमुख सहायक ऊस विकास अधिकारी पूर्णा स साखर कारखाना लि वसमतनगर जि हिंगोली.संपर्क. ८७८८७५६१०५

Previous articleलोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचा कारभार दोनच शिक्षकांच्या भरोशावर. .
Next articleआज माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेत केले जाहीर प्रवेश…..