Home Breaking News मिरखेल ते फुकटगाव मार्ग रस्ता दुरुस्त करण्याची संभाजी सेनेची मागणी

मिरखेल ते फुकटगाव मार्ग रस्ता दुरुस्त करण्याची संभाजी सेनेची मागणी

परभणी, (आनंद ढोणे) :- पूर्णा व परभणी तालूक्यातील मिरखेल-गणपूर-कान्हेगाव -फुकटगाव प्रजिमा १५ ला मिळणारा मार्ग ईजिमा १२ या मार्ग रसत्याची दुरुस्ती सुधारणा करण्याची मागणी पूर्णा तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्याकडे संभाजी सेनेने निवेदन देऊन नुकतीच केली असून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा ईशारा देखील देण्यात आला आहे. सदरील रस्ता गत अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. रस्त्यावर ऐवढे मोठ मोठाले खड्डे पडलेत की, “खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे” हे कळत नाही. एवढी या रस्त्याची बिकट अवस्था होवून संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य होवून बसले आहे. सदरील रस्त्यावरुन मार्गक्रमण करणे अतिशय तारेवरची कसरत झाली आहे. कान्हेगाव, ममदापूर येथील विद्यार्थ्याकरिता सौ रुख्मीणबाई आंभोरे उच्च माध्यमिक विद्यालय येथे जाण्यासाठी बस सुविधा उपलब्ध आहे. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गणपूर ते कान्हेगाव या ठिकाणी पडलेल्या खड्यामुळे बस गावात पोहचू शकत नाही. त्यामुळे कान्हेगाव व ममदापूर येथील विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना गणपूर गावापर्यंत ४ किमी अंतर पायपीट चिखल तुडवत प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पालक मुलींना शाळेत पाठवण्यास असमर्थता दर्शवत आहेत.

त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शाळाबाह्य मुला मुलींची संख्या वाढू लागली आहे. रस्त्याच्या कामासाठी ह्या गावातील ग्रामस्थांनी स्थानिक लोकप्रतिनिधीकडे अनेक वेळा मागणी केली परंतु निष्क्रीय लोकसेवकांनी जाणिवपूर्वक दूर्लक्ष केले. रस्ता जैसे थे राहीला.त्यामुळे आता प्रशासकीय अधिका-यांनी तरी विद्यार्थ्याप्रती सहानुभूती दाखवून सदर रस्ता तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावा जेणेकरुन मुलींसाठी बससेवा चालू होईल. असे निवेदनात नमूद करण्यात आले असून त्यावर संभाजी सेनेचे तालुकाध्यक्ष गोविंद मोरे, उपाध्यक्ष आंगद बोबडे, तालूका संपर्क प्रमुख सोपान काळबांडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous articleअखेर…. शिवबंधन बांधले! 👉 मा. खासदार सुभाष वानखेडे यांचा शिवसैनेत प्रवेश.
Next articleदेशाच्या राष्ट्रपतीपदी द्रोपती मुर्मु व ओबीसीचे आरक्षण मिळाल्या बद्दल हिमायतनगर येथे दुहेरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला…..