Home Breaking News “आधारवड”

“आधारवड”

आज्याचे हात निबरलेले
नातवाला टोचत नाहीत
केससुद्धा आधार देतात
माया काही संपत नाही.

चष्म्या मधून रस्ता पहात
जपून आजा चालत राही
मायेच्या या गाठोड्याला
जीवापरी जपत राही

सरती पिढी वारसाला
डोक्यावर बसून घेई
आपल्यापेक्षा मोठा हो
कृतीतून सांगत राही

दुधापेक्षा साय मऊ
स्नेह तिथे गोळा होई
क्षण क्षण आनंदाचा
जाता जाता जगून घेई

एक नागडा दुसरा उघडा
कुणाला काही वाटत नाही
माया असते काळजात
तिथे कापडाची गरज नाही

दोघांचही बालपणच
दोन टोकं जीवनाची
भूपाळी ती एकाची नि
भैरवी ती दुसऱ्याची!

✍️✍️ तेलंगे सर माहुर

Previous articleअकोल्यात घराला लागलेल्या आगीत वृद्ध महिलेचा मृत्यू
Next articleश्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वाडेगाव येथे पार पडला अंतिम सामना