हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070
१ मे हा दिवस आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपण महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो या दोन्ही दिवसाचे महत्त्व जरी वेगवेगळे असले तरी त्यामध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे कष्ट, परिश्रम व स्वाभिमान होय.
कामगार दिन हा जगभरातील कामगारांच्या कष्टांना मान देण्यासाठी साजरा केला जातो. प्रत्येक उद्योग, शेती, कारखाना, बांधकाम किंवा सेवा क्षेत्रात काम करणारा कामगार आपल्या घामाने देशाची प्रगती घडवतो. त्यांच्या मेहनतीमुळेच समाजाचा विकास शक्य होतो. म्हणूनच या दिवशी कामगारांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्यांना योग्य वेतन, सुरक्षितता आणि सन्मान मिळावा यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे.
त्याच दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो, कारण १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मराठी भाषिक लोकांसाठी स्वतंत्र राज्य मिळावे या उद्देशाने झालेल्या चळवळीमुळे महाराष्ट्राची निर्मिती झाली. अनेक हुतात्म्यांनी या लढ्यात बलिदान दिले, त्यांच्या स्मृतीला आपण या दिवशी अभिवादन करतो. आज महाराष्ट्र हे औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते.
कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन या दोन्ही दिवसांचा संदेश आपल्याला एकच शिकवण देतो—कष्टाला मान, आणि आपल्या संस्कृती व राज्याबद्दल अभिमान.
चला तर मग आपण सर्वांनी प्रामाणिकपणे काम करून महाराष्ट्राच्या प्रगतीत आपला हातभार लाऊ या.
१ मे हा दिवस जगभरातील सर्व कामगारांना समर्पित आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात १९ व्या शतकाच्या सुमारास अमेरिकेत कामगार चळवळीच्या रूपात झाली. भारताच्या बाबतीत, १ मे १९२३ मध्ये चेन्नई येथे पहिला कामगार दिन साजरा करण्यात आला. कामगार आणि कामगारांच्या प्रयत्नांचा तसेच त्यांच्या कामाचा विचार करण्यासाठी हे प्रतीक म्हणून केले गेले.
त्यातील नारायण मेघाजी लोखंडे हे सामाजिक व कामगार चळवळीतील एक कामगार नेते होते. त्यांचे मुळ गाव कनेरसर, ता.खेड, जि.पुणे असून त्यांचा जन्म 1848 रोजी ठाणे येथे झाला. शालेय शिक्षण मॅट्रिक पर्यंत पूर्ण झाल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी प्रथम रेल्वेत क्लार्क म्हणून तसेच गिरणीत स्टोअर कीपरची नोकरी केली. पुढे ते महात्मा फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी सत्यशोधक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. नंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८८० साली नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी मुंबईत दीनबंधू हे वृत्तपत्र आणले व त्याचे त्यांनी १८८८ सालापर्यंत संपादक म्हणून काम पाहिले. पुढे त्यांनी १८८४ साली गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी महात्मा फुले यांच्या मदतीने त्यांनी बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना केली. त्याकाळी गिरणी कामगारांना दररोज तेरा ते चौदा तास काम करावे लागे. त्यांना आठवड्याची सुट्टी मिळत नसे, जादा कामाचा मोबदला मिळत नसे, वैद्यकीय सुविधा मिळत नव्हती, दुपारच्या जेवणाची सुट्टी मिळत नसे, कुटुंबाला पेन्शन मिळत नसे. असे सर्व हक्क व अधिकार मिळवण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडे यांनी अनेक आंदोलन संप संघर्ष करून सर्वाधिकार कामगारांना मिळवून दिले. याचे सर्व श्रेय नारायण मेघाजी लोखंडे यांना जाते. त्यांच्या या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना रावबहादूर ही पदवी प्रदान केली. आणि शेवटी ९ फेब्रुवारी १८९७ रोजी प्लेग्रस्तांना मदत करता करता नारायण मेघाजी लोखंडे यांचे प्लेगमुळे निधन झाले. अशा या झुंजार कामगार नेत्यास भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून संबोधले गेले. पुढे भारत सरकारने ३ मे २००५ रोजी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृती पित्यर्थ पाच रुपयाचे पोस्टाचे तिकीट अनावरण केले. अशा या महान कामगार नेत्यास कामगार दिनानिमित्त त्रिवार सलाम.
लेखन:-योगेश कापडणीस (कामगार) नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे




