Home Breaking News **सोयाबीन वरील पिवळ्या मोझॅक व्हायरसचे नियंत्रण करा.

**सोयाबीन वरील पिवळ्या मोझॅक व्हायरसचे नियंत्रण करा.

मंडळ कृषी अधिकारी काळे एम. एस. यांचे प्रतिपादन

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 23/ 08/2023

हिमायतनगर तालुक्यातील मौजे
सोनारी परिसरात महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सोयाबीन सर्वेक्षण करते वेळी पिवळ्या मोझॅक व्हायरस ( केवडा ) आढळून आला.
सदरील प्रादुर्भाव लक्षात आल्यामुळे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी गावात जाऊन सभा घेऊन सोयाबीनवरील केवडा रोगा बाबत माहिती दिली.
नंतर प्रक्षेत्रावर जाऊन श्री. दिगंबर साहेबराव सूर्यवंशी यांच्या शेतामध्ये जाऊन कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर जिल्हा. हिंगोली. येथील विषय विशेष तज्ञ कीटकशास्त्र विभाग श्री. अजय सुगावे सर यांनी द्राक्ष श्राव्य माध्यम ( व्हिडिओ कॉल ) च्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात सदरील रोगाचे लक्षणे, ओळख व नियंत्रण उपाय सांगून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन सर्व शेतकरी बांधवांचे समाधान केले.
सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरांजवळ विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात. त्यानंतर पाने जशी परिपक्व होत जातात तशी त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. दाण्यामधील तेलाचे प्रमाण घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते. हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो. विषाणूचा प्रसार मुख्यतः पांढरी माशी या किटकाद्वारे होतो.
*एकात्मिक व्यवस्थापन*

पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव झालेली पाने, झाडे वेळोवेळी काढून नष्ट करावीत, जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल.

वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे.

रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून थायोमिथॉक्झाम (२५ टक्के) 2 ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये एकरी १० पिवळे व १० निळे चिकट सापळे लावावेत.

फवारणीसाठी किटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी.

नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा.

कमीत कमी पहिले ४५ दिवस पीक तणमुक्त ठेवावं.

पावसाचा ताण पडल्यास पिकाला संरक्षित पाणी द्यावं.

बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी. जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडतो आणि पुढील हंगामात किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो.

पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर दुसरी फवारणी करावी.
तसेच श्री. विकास प्रकाश माने यांच्या शेतात जाऊन प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळासकट उपटून ते नष्ट कसे करायचे याची प्रत्यक्ष करून दाखवण्यात आले.
यावेळी बहुसंख्य सोयाबीन उत्पादन करणारे शेतकरी उपस्थित होते.

 

सदरील सभेस अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच श्री. सुधाकर पाटील, प्रमुख पाहुणे श्री. काळे एम एस मंडळ कृषी अधिकारी, हिमायतनगर, श्री. निलेश वानखेडे कृषी पर्यवेक्षक, श्री. सुदर्शन माने कृषी पर्यवेक्षक, शेख युनूस उपसरपंच , श्री. स्वाती ढगे कृषि सहाय्यक, प्रा. ढगे एस. जी. यांनी शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी मधुकर पवार, अमोल पवार, विजय पवार, पुण्यशील वाघमारे, पुंडलिक माने, बाबाराव माने, पोटेकर, मनोज पवार, प्रकाश माने, संतोष भिंगोरे, सुधाकर पवार, रामदास कदम, आनंद सूर्यवंशी, कुदळकर हे उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सहाय्यक सौ. एस. आर. बेहेरे – ढगे यांनी केले.

Previous articleजय श्री राम च्या जय घोषात विश्व हिंदु परिषद बरंच दलाची भव्य मशाल रॅली …..
Next articleप्राथमिक जि .प .कन्या शाळा दुरुस्तीसाठी आमरण उपोषण