Home कृषीजागर पेरणीसाठी शेती सज्ज, बळीराजा ला लागली पावसाची तिव्र ओढ!

पेरणीसाठी शेती सज्ज, बळीराजा ला लागली पावसाची तिव्र ओढ!

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी

संभापूर:-मृग नक्षत्राची सुरूवात झाली

परंतु मान्सूनचा दमदार पाऊस केव्हा येणार याकडे बळीराजासह सर्वांचेच डोळे आकाशा कडे लागले असून, वरून राजाच्या वक्रदृष्टीने बळीराजा घायाळ होत आहे. काही शेतकर्‍यांनी विहिरीतील मुबलक पाण्यावर खरीप हंगामाच्या पिकाच्या पेरणीस प्रारंभ केला आहे. जाणकार शेतकरी दरवर्षी मृग नक्षत्र सुरू होताच खरीप हंगामाच्या पेरणीसाठी सज्ज होत असतो. काही प्रमाणात सिंचनाच्या सोयी असल्यामुळे सिंचनाचे पाणी देऊन बियाण्याची पेरणी शेतकरी करित असतो. उंबर्डा बाजार परिसरात शेती मशागतीची कामे पण शंभर टक्के पूर्ण झाल्यामुळे शेतकर्‍यांचे लक्ष पेरणी कडे लागले आहे.
ज्या शेतकर्‍याकडे पाण्याची सोय आहे, त्यांनी आपल्या परीने कपाशी लागवड केली. मात्र अजूनही काही कोरडवाहू शेतकरी निसर्गाच्या दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहे. हवामान खात्याच्या अंदाजापवरून यंदा मान्सून लवकर येणार असा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे शेतकर्‍यांनी शेती उन्हाची पर्वा न करता घाम गाळून पेरणीसाठी जमीन सज्ज केली. जुन्या काळापासून ग्रामीण भागात शेतकरी पक्ष्याच्या घरटी बांधणीवरून शेतकरी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करीत असतात. तर कधी मोठ्या प्रमाणात मुंग्यां व हवेत उडणारा किड्या वरुण पावसाचा अंदाज लावायचे. त्यामुळे शेतकर्‍यांना आता मान्सूनचे वेध लागले आहे.

Previous articleग्रामीण भागातील महिला पुरुषांनी मोफत रेशीम कोष उद्योग प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा
Next articleआकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी, पण शेतकरी पावसासाठी हैराण..