Home Breaking News *माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या उपोषण व धरणे आंदोलनाला यश*

*माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या उपोषण व धरणे आंदोलनाला यश*

माहिती आयुक्तांच्या रिक्त जागा दोन महिन्यात भरण्याचे शासनाचे आश्वासन

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगाव

मुंबई -राज्य माहिती आयोग कार्यालयातील व खंडपीठातील आयुक्तांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली असून येत्या दोन महिन्यात माहिती आयुक्तांच्या सर्व रिक्त भरण्यात येतील तसेच जास्तीत जास्त जनमाहिती अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करू त्याच बरोबर शालेय अभ्यासक्रमात माहिती अधिकार कायद्याचा सबोध परिचयात्मक पाठ समाविष्ट करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून शिक्षणविभागाकडे पत्रव्यवहार केला जाईल तसेच माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून दक्ष राहू असे आश्वासन सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव प्रकाश इंदलकर यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशच्या शिष्टमंडळाला दिले.
वरील मागण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे १ मार्च २०२३ पासून फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या तीस जिल्ह्यातून आलेले शेकडो कार्यकर्ते उपोषण व धरणे आंदोलनास बसले होते. या आंदोलनाकडे महाराष्ट्रातील हजारो माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले गेले होते. मागण्यांच्या दखल घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही. असा सर्व कार्यकर्त्यांचा निर्धार होता. अखेर तिसऱ्या दिवशी ३ मार्च २०२३ रोजी शासनाने आंदोलनाची दखल घेतली आणि चर्चे साठी शिष्टमंडळाला बोलावले.
शासनावतीने चर्चा करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव प्रकाश इंदलकर व कक्ष अधिकारी श्रीमती अचला खांडेकर या होत्या , तर माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या वतीने सुभाष बसवेकर (अध्यक्ष महाराष्ट्र ) व दिपक पाटील (अध्यक्ष मुंबई शहर) हे आंदोलकांचे प्रतिनिधी म्हणून मंत्रालयात चर्चा करण्यासाठी गेले होते.
शासनांशी चर्चा झाल्यानंतर अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी झालेल्या चर्चेचा गोषवारा आझाद मैैदानावर आंदोलन स्थळी उपस्थित असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना दिला. आपले आंदोलन यशस्वी झाले याचे समाधान कार्यकर्त्यांमध्ये होते.या प्रसंगी बोलातना सुभाष बसवेकर म्हणाले की,ज्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.ज्यांनी सोशल मिडीयावरून प्रचार प्रसार केला. व ज्यांनी ज्यांनी शासनाकडे ई -मेल करून आपली संघटीत शक्ती दाखवली या सर्व कार्यकर्त्यांकडे या यशाचे श्रेय जाते.
भविष्यातही माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून आपण असेच संघटीतपणे काम करीत राहू असा निर्धार यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यानी व्यक्त केला.

Previous articleसंजयभाऊ चाभरेकर यांचा कृषि महोत्सवात सपत्नीक गौरव!
Next articleड्रॅगनफुड फळपिकांचे विक्रमी उत्पादन घेतल्यामुळे 👉 जिल्हा कृषी महोत्सवात झाला सन्मान