
नाशिक मधील अशोक खरात या भोंदू बाबांचे प्रकरण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात प्रचंड गाजत आहे आणि वाजतंही आहे. अशोक खरात हा काही पहिला भोंदू बाबा नाही. या अगोदर असे अनेक भोंदू बाबा येऊन गेले. मांत्रिक, बाबा, बापू ,महाराज अशी नवंनवी रुप घेऊन दरवर्षी नवे नवे बाबा प्रकट होतात. कुणी मन:शांती प्रदान करतो कुणी घरात,कुटूंबात शांतता प्रस्थापित करतो,कुणी दुर्धर आजार बरे करतोय तर कुणी निपुत्रिकांना कुळाचा वंशज निर्माण करुन देतोय. कुणी गुरु रूप धारण करुन येतोय,कुणी अमुक तमुक विद्येचा ज्ञानी म्हणून येतोय. समाजातील “अज्ञानाचा” फायदा घेऊन आपलं दूकान चालवितो….!!
महिलांवरील अत्याचाराची “अती” झाली की, तक्रार केली जाते,परिणामी त्यांची लैंगिक कारनामे ऊघडं होतात मग चविष्ट चर्चा सुरू होतात. समाजमन ढवळून निघते.आसाराम बापू,रामरहीम,आणि बरेच भोंदू बाबा महिलांच्या लैंगिक शोषणाच्या पोलीस तक्रारी वरुनच ऊघडे पडलेत हे वास्तव आहे….!!
परंतु आश्चर्याची बाब म्हणजे, समाजाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला म्हणून, महिला, कुमारी मुलींचे लैंगिक शोषण केले म्हणून. माता भगिनींच्या भावनेशी खेळले म्हणून.नैतिकतेचा खुन केला म्हणून, समस्त स्त्री जातीची फसवणूक केली म्हणून, अनेक महिलांचे चारित्र्य हनन झाले म्हणून,कुण्या भोंदू बाबाला जबर शिक्षा झाली काय.??
कायद्याचा अंमल करणारे सरकार कोणत्याही राजकीय पक्षाचे असो. वरील प्रश्ननाचे ऊत्तर लोकशाही लागू होऊन ७५ वर्षे ऊलटून गेल्या नंतर अद्यापही समाधान कारक मिळालेले नाही. एकाही भोंदू बाबाला जबर शिक्षा झाली नाही हे वास्तव आहे आणि म्हणूनच नवनवे बाबा प्रकट होण्याचे थांबले नाही…!!
प्रत्येक भोंदू बाबांच्या कारनाम्यामुळे अनेक महिलांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली. कित्येक संसार उध्वस्त झाले. कित्येक कुटुंब बदनामी पायी स्थलांतरित होऊन बर्बाद झाले.कित्येक माता भगिनींनी नरक यातना सहन केल्या आहेत. कित्येकींनी जीवन संपविले आहे. हे वास्तव आहे. त्याची भरपाई कोण करेल.??
भोंदू बाबा तयार होणारी ही फॅक्टरी खूप जुनी आणि मान्यताप्राप्त आहे.खरंतर हेही नव्या पिढीने समजून घेतले पाहिजे. महिलांच्या लैंगिक शोषणाचे मान्यताप्राप्त नमुने पुरातन काळापासून मंदिर संस्कृती मध्ये सापडतात. “देवदासी” हा प्रकार हिंदू मंदिरात राजरोस पणे चालायचा. देवदासी चे कार्य कोणते.? अज्ञान मुलींना देवदासी बनविले कुणी.? आणि कशासाठी.? हिंदू धर्मातील मुरळ्या हा काय प्रकार होता.??
स्त्री देहाच्या,विटंबनेची,शोषणाची ही जुनी परंपरा पुरातन काळापासून आपल्या देशात राजरोस पणे सुरू होती.त्याला धार्मिक संस्कृती म्हणून नांव दिलें,हीच मनुस्मृती ची रीत. आता संविधानाच्या अमलाचा काळ आहे म्हणून मनुस्मृती च्या स्त्री शोषणाच्या परंपरा बंद व्हायला पाहिजे ही प्रत्येक संविधानवादी नागरिकांची अपेक्षा आहे.मात्र मनुवादी समुह ही परंपरा अखंडीत चालू रहावी म्हणून आजही प्रयत्नशील आहे हे समजून घेतले पाहिजे… . !!
आसाराम बापू, रामरहीम जसे जबर शिक्षेविना जगतं आहेत. आणि सहा सहा महिने पॅरोलवर येऊन बिनदिक्कत जगतं आहेत तसे नाशिक चा अशोक खरात सुद्धा आरामदायी जगेल परंतु त्याला जबर शिक्षा होणार नाही. त्याचे कारण असे की, लोकशाही व्यवस्थेमध्ये मनुवादी विचारांच्या लोकांनी मोक्याच्या जागा काबीज केल्या आहेत. समाजाला भ्रमीत करण्याचा प्रयत्न मनुवादी मिडिया ने सुरू केला आहे. प्रशासकीय पातळीवरुन अनेक पुरावे नष्ट करणारी प्रक्रिया सुरू झाली आहे. मनुवादी धेंडाचे काळे कारनामे ऊघडं होऊ नये म्हणून अशोक खरात ला जेलमध्ये संपविल्या जाईल किंवा आसाराम बापू सारखी हमी देऊन जबर शिक्षेतून वाचविण्याचा प्रयत्न केला जाईल. लोकशाही मार्गाने कठोर पणे कायद्याची अंमलबजावणी मात्र केली जाणार नाही हे वास्तव आपणं सर्वांनी समजून घेतले पाहिजे….!!
अशावेळी सर्वसामान्य नागरिकांच्या हातात काय आहे.? हा प्रश्न प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी ,५० टक्के संख्या असलेल्या स्त्री समुहाने आपल्या मनाला, समाजातील सुज्ञ जणांना विचारला पाहिजे. आणि या जुनाट रोगावर ऊपाय शोधला पाहिजे….!!
भोंदू बाबांच्या या दुष्टचक्रातून कायमची सुटका हवी असेल तर स्त्री समुहाने पुढाकार घेतला पाहिजे आणि मनुस्मृती प्रणित व्यवस्था हवी की, संविधानवादी व्यवस्था हवी यापैकी एकाची निवड केली पाहिजे. दुटप्पीपणा स्त्री वर्गाला या दुष्टचक्रातून मुक्त होऊ देतं नाही….!!
भारतीय स्त्री ला उद्देशून एका कवीने अतिशय मर्मभेदक कवन केले आहे…
तु पुजलं तुझ्या देवाला.
त्यानं मुरळी तुलाच केली.
त्यानं देवदासी तुलाच केली.परंतु
जीनं वंदन केलं भीमाला. ती वकील डॉक्टर झाली.
हा मनुस्मृती प्रणित आणि संवैधानिक व्यवस्थे मधील फरक महिलांनी समजून घेतला तर भोंदू बाबांच्या दुष्टचक्रातून सुटका करण्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो….!!
ज्या ज्या महामानवांनी आणि महामातांनी परिवर्तनवादी चळवळीत मनुस्मृती चा कडाडून विरोध केला आणि समता, मानवता रुजविण्यासाठी आयुष्य खर्ची घातले ती चळवळ समस्त महिला वर्गाने समजून घेतली पाहिजे. त्या वाटेवर चालल्या शिवाय मनुस्मृती प्रणित व्यवस्थे तून मुक्ती नाही हे समजून,उमजून घ्यावे लागेल….!!
पुरोगामी म्हणून काम करणाऱ्या चळवळी नेटाने काम करीत नाहीत. ढोंगी लोकांनी पुरोगामी चळवळीचा पचका केला आहे.म्हणून मनुवादी प्रवृत्तीने डोके वर काढले आहे. म. फुले यांच नांव घेऊन समता परिषद काढायची आणि मनुवादी व्यवस्थे सोबतं रहायचं हा ढोंगीपणा नाही का.? संभाजी ब्रिगेड मध्ये काम करणारे आरएसएस प्रणित भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून लोकप्रतिनिधी होतात हा वैचारिक व्यभिचार नाही का.? पुरोगामी,पुरोगामी म्हणतं म्हणतं मनोहर भिडे ला आपल्या घरात संरक्षण द्यायचं हा ढोंगीपणा नाही का.? वारकरी संप्रदायी म्हणवून घेत मनुवादी विचार पेरणीसाठी सप्ताह घेणे हा वैचारिक व्यभिचार नाही का.? हेही कारण समजून घेतले पाहिजे आणि त्यावर तोडगा काढण्याची वेळ आली आहे हेही लक्षात घ्यावे लागेल…!!
प्रबोधनकार म्हणून मिरविणारे सरळसरळ जाहीर भाषणात खरं बोलू की, बरं बोलू. अशी मांडणी करणारे लोक समतेच्या,मानवतेच्या चळवळीला लागलेली किड आहे. हेही समजून घ्यावे लागेल. बरं बोलून सत्य लपवतं अर्धसत्य मांडणारे दुटप्पीपणा करतात आणि समतेच्या चळवळीला नख लावण्याचा प्रकार केला जातो…!!
काळाची गरज लक्षात घेता. जगाच्या प्रगतीचा आलेख बघता. भारतीय बहूजन समाज आणि ५०% समुह असलेल्या भारतीय महिला वर्गाने संविधानवादी बनुन मनु प्रणित विकृती मधून मुक्त व्हावे अशी अपेक्षा बाळगतो….!!
जयभीम. @.. भास्कर भोजने.




