संदिप देवोचे प्रतिनिधी
ग्रामपंचायत कारभारावर गंभीर आरोप; प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी
ग्रामीण पत्रकार संदिप देवचे
जलंब:ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांवरून जलंब येथील शेषराव शामराव भोजने यांनी थेट आमरण उपोषणाचा इशारा दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीने याबाबत अधिकृत पत्राद्वारे पंचायत समिती प्रशासनाला सूचना देत, ठराविक मुदतीत कारवाई न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे स्पष्ट केले होते.
प्राप्त माहितीनुसार, ग्रामपंचायतीमध्ये विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः सन २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या कालावधीत झालेल्या कामांमध्ये निधीचा अपव्यय व नियमबाह्य खर्च झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये दलित वस्तीसाठी मंजूर निधीच्या कामांमध्येही अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदाराने यापूर्वी दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर केली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस चौकशी अथवा कारवाई न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, संबंधित दोषींवर ८ दिवसांच्या आत कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता.
उपोषणाची तारीख व ठिकाण
तक्रारदाराने दिनांक २७ एप्रिल २०२६ (सोमवार) पासून ग्रामपंचायत कार्यालय, जलंब समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये इतर ग्रामस्थही सहभागी होणार असल्याचे पत्रात नमूद आहे..



