Home Breaking News जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांची परवड बाहेरगावी मजुरीसाठी गेलेल्या नागरिकांना वारंवार फेऱ्या...

जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांची परवड बाहेरगावी मजुरीसाठी गेलेल्या नागरिकांना वारंवार फेऱ्या मारूनही मिळत नाहीत दाखले

भूमीराजा न्यूज प्रतिनिधी/संतोष मोरे

बाळापूर :- अकोला जिल्ह्यातील व बाळापुर तहसील कार्यालयात जन्म व मृत्यू दाखल्यांचे अर्ज अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात नगर परिषद वार्ड क्रमांक ६ चे नगरसेवक संजय शेवराय उमाळे यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे।
निवेदनानुसार, बालापूर नगर परिषद मार्फत तहसील कार्यालयात जन्म व मृत्यू दाखल्यांच्या नोंदीसाठी अनेक अर्ज सादर करण्यात आले आहेत. मात्र मागील सहा महिन्यांपासून हे अर्ज मंजूर झाले नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यात नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत।
विशेष म्हणजे, रोजगार व मजुरीसाठी बाहेरगावी गेलेल्या नागरिकांना जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी वारंवार बाळापुरला चकरा माराव्या लागत आहेत. अनेक वेळा ये-जा करूनही संबंधित नागरिकांना वेळेत दाखले मिळत नसल्याने आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे।
निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, काही प्रकरणांमध्ये घरगुती जन्म, घरातील मृत्यू, अपघाती मृत्यू तसेच आत्महत्येच्या घटनांची नोंद अद्याप प्रलंबित आहे. अशा प्रकरणांमुळे संबंधित कुटुंबांची अनेक कामे रखडली आहेत।
दरम्यान, या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी विविध सामाजिक व राजकीय संघटनांनीही संबंधित विभागाला निवेदने देत जन्म व मृत्यू दाखले तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। नागरिकांना मूलभूत कागदपत्रांसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे।
नगरसेवक संजय उमाळे यांनी प्रशासनाने या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्व प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावेत व नागरिकांना वेळेत प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी केली आहे।

Previous articleसामुहिक विवाह हि काळाची गरज* मा. जिल्हाध्यक्ष तिप्पनवार यांचे प्रतिपादन…
Next articleगावात नागरी सुविधांचा अभाव नागरिकांचे आरोग्य धोक्यात !