Home Breaking News वारसा शिल्पकलेचा…. परिस प्रकाशन लेखक – संदीप राक्षे…

वारसा शिल्पकलेचा…. परिस प्रकाशन लेखक – संदीप राक्षे…

.हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमिराजा
मो. नो.8983319070

वारसा शिल्पकलेचा हे पुस्तक परिस प्रकाशन व्दारे मा शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते प्रकाशित झाले आहे.

प्रतिनिधी – सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे

वारसा शिल्पकलेचा हे पुस्तक हातात पडले आणि त्याच्या मुखपृष्ठावरील ऐतिहासिक वास्तू बघुन कितीतरी वेळ नजर मुखपृष्ठावरच खिळून राहिली. वाचण्याचा मोह आवरला नाही, वेळ काढून पुस्तक वाचायला घेतले, राक्षे सरांनी पहिलं प्रवास वर्णन लिहिलेयं ते पुण्यातल्या च सोमवार पेठेतील अद्भुत त्रिशूंड गणेश मंदिरा बद्दल, त्या मंदिरातील प्रत्येक मुर्ती वरील कोरीव काम आणि तिचे महत्त्व आणि पूर्वीच्या काळी या मंदिरात जी योग साधना व्हायची त्याबद्दल सविस्तर वर्णन त्यांनी केले आहे .
दुसरे प्रवास वर्णन त्यांनी पेडगावचा धर्मवीर गड याचे केले आहे, त्यात त्यांनी प्रचिन काळी भुईकोट किल्ल्याचे बहादूर गड आणि २००८ मध्ये त्यांचेच कशाप्रकारे धर्मवीर गड असे नाव ठेवण्यात आले याचे सविस्तर माहिती त्यांनी मांडली आहे . तेथीलच भैरवनाथ मंदिर, रामेश्वर मंदिर, एक भग्न अवस्थेत असलेली पिड, अशाच अनेक दुर्लक्षित शिल्पाकृती ही त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत, छंदोगामात्य कवि कलश आणि छत्रपती संभाजी राजे यांचा औरंगजेब ने केलेला छळ आणि त्यांची मृत्यू सोबत ची झुंज बहादूर गडाच्या कोठडीत आजही टाहो फोडते, या अशाच शिल्पाकृती, इतिहासातील काही क्षण चिरंजीव ठेवतात, या शिल्पाकृती मुळेच इतिहास डोळ्यासमोर पुन्हा उभा रहातो . सर तळमळीने या वास्तुला भेट देण्यासाठी याचना करतात .
धारासूरचे गुप्तेश्वर मंदिर हे विष्णूचे मंदिर, लेखकांच्या डोळ्यासमोर आल्यानंतर त्यांना कवि खलिल मोमीन यांच्या काही ओळी आठवल्या, त्या त्यांनी इथे व्यक्त केल्या त्या अशा
असे वाटते पाहुनी भव्य सृष्टी
जशी पेरली दिव्य स्वप्ने कुणी
मती गुंग होते तिला पाहतांना
यथायुक्त केल्यामुळे आखणी

या ओळीतून लेखकाने या शिल्पाकृतीची मनमोहन सुंदरतेचं वर्णन केलेय. या मंदिरा बद्दल मंदिराचे सेवेकरी बाबू उंडाळकर यांच्या कडुन सर्व माहिती काढून घेतली, तेथील सर्व शिल्पांबद्दल लेखकाने सविस्तर वर्णन केले आहे, महत्त्वाचे म्हणजे अनेक सुरसुंदरींचे नावासहित त्यांच्या शिल्पाकृती बद्दल लेखक जेव्हा लिहितात ते वाचतांना त्या साक्षात आपल्या समोर असल्याचा भास होतो. छोट्या छोट्या चारोळ्या प्रत्येक शिल्पांच्या सौंदर्य बद्दल आत्मीयता व्यक्त करतात.
जुन्नर चावंडच्या किल्ल्यावरचे निसर्ग सौंदर्य, ऊन पावसाचा खेळ, सभोवतालची हिरवाई त्याच बरोबर किल्ल्यावरची शिव मंदिर, तलाव, भुयारी मार्ग, गुहा लेण्या यांचे सविस्तर वर्णन त्यात आहे .
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेली पुणे जिल्ह्यातील जुन्नर भूमीला स्वर्गाची उपमा दिली आहे, तेथील कुकडेश्वर मंदिर, मंदिरातील पिंडीतून मिळणाऱ्या ऊर्जेची अनुभुती लेखकाने स्वतःसोबतच वाचकाला ही करून दिली.लेखक या प्रवासवर्णनात पुरातन गड किल्ले ऊर्जादायी असतात कल्याणकारी असतात त्यामुळे त्या वास्तुनां भेट देण्यासाठी ते कळकळीने विनंती करतात.
त्याचप्रमाणे कोथळीगड, कोहिंड्याचा कुंडेश्वर, निमगिरी किल्ला, कपर्दिकेश्वराचं ओतूर, पळशीचे विठ्ठलमंदिर, श्री विष्णू मंदिर जांब परभणी, काठापूरचा वाघ वाडा, आणि शेवटी श्री क्षेत्र आपेगाव येथील अद्भुत दृश्य म्हणजे शक्य नसतांना ही प्रकटले सूर्यदेव आणि पार पडलेला किरणोत्सव…
लेखकाने या पुस्तकात आपल्या पूर्वजांच्या कलेचा, त्यांच्या श्रध्देचा, परंपरा आणि निष्ठेचा उत्कृष्ट नमुना येथे सादर केलाय, अतिशय अमूल्य ठेवा आपल्या कडे असतांना आपण पर्यटनासाठी भारता बाहेरील ठिकाण निवडतो तेव्हा त्या विचारांना एक चपराक म्हणून हे पुस्तक आहे .
प्रदुषणामुळे आणि ऊन वारा पाऊस यामुळे अशा शिल्पकृती, गड, किल्ले यांची अधोगती जरी आज झाली आहे, आणि अशा वास्तुनां जर सरकारने ही दूर्लक्षित केलेले आहे तेव्हा आपल्याला पुढाकार घेऊन अशा वास्तुचे जतन केले पाहिजे, याच वास्तु आपल्याला इतिहासातील घटना, स्वांतत्र्यासाठी दिलेल्या आहुत्या, पुरातन तत्वे, परंपरा, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या चालीरीती यांची नोंद घेण्यास भाग पाडतात .
छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचा इतिहास , दऱ्याखोऱ्यातुन याच गडकिल्ल्यातुन अजुन ही दुमदुमतो, महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक गड किल्ल्यावर गेल्यानंतर एक आंतरिक ऊर्जा प्राप्त होते, जी नकारात्मक शक्तीला परावृत्त करते, जिवनात प्रेरक ठरते.
वारसा शिल्पकलेचा या पुस्तकातुन लेखकाने फक्त लेण्या गड किल्ले, निसर्ग सौंदर्य आणि शिल्पाकृती यांचेच महत्त्व न सांगता , आपल्या पूर्वजांच्या कलेचा आणि त्यांची त्या वास्तु विषयी असलेल्या श्रध्देचा दाखला दिला आहे. पुस्तक अतिशय वाचनीय आहे , त्याच सोबत ज्या वास्तु आपण बघितलेल्या नाही त्या बघण्याची अनुभुती या पुस्तकातुन होते, हेच संदिप राक्षे या लेखकांच्या शब्दांचे सामर्थ्य आहे….

कवयित्री लेखिका – प्रतिभा खैरनार
नांदगाव जि नाशिक
छायाचित्रकार – सुनिल ज्ञानदेव भोसले पुणेः

Previous articleकळमनुरी येथे नवनिर्वाचीत शिवसेना पदाधिकारी यांचा सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न
Next articleबजरंग गणेश मंडळा तर्फे आयोजन केलेल्या रक्तदान शिबिरात युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….