Home Breaking News रमजानसाठी बाळापूर बाजारपेठ सज्ज

रमजानसाठी बाळापूर बाजारपेठ सज्ज

ईदसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीत नागरिकांचा उत्साह

संतोष मोरे तालुका प्रतिनिधी बाळापूर :-‌ अकोला जिल्ह्यातील व बाळापूर येथे पवित्र रमजान महिन्याच्या अखेरच्या दिवसांकडे वाटचाल सुरू असताना बाळापूर शहरातील बाजारपेठांमध्ये सध्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण ईदसाठी लागणारे कपडे, शिरखुर्म्याचे साहित्य व इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी उत्साहाने बाजारात येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठा सध्या उजळून निघाल्या असून व्यापार्‍यांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुस्लिम धर्मामध्ये रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव पहाटे उठून तहज्जुदची नमाज अदा करतात, सहरीनंतर रोजा (उपवास) सुरू करतात आणि दिवसभर संयम व इबादतीत वेळ घालवतात. दिवसातील फजर, जोहर, असर, मगरिब व इशा या पाच वेळच्या नमाजांसह रात्री तरावीहची नमाजही अदा केली जाते. त्यामुळे संपूर्ण महिनाभर आध्यात्मिक वातावरण निर्माण झालेले असते.

रमजान महिन्यातील शेवटचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. विशेषतः शबे-कद्र ही रात्र मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते. सध्या रमजानचे अवघे काहीच दिवस उरले असल्याने ईदच्या तयारीला वेग आला आहे. नागरिकांकडून कपडे, सुगंधी अत्तर, टोपी, चप्पल तसेच शिरखुर्म्यासाठी लागणारे शेवया, खजूर, सुका मेवा, दूध व साखर यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.दरम्यान, बाळापूर शहरातील मुख्य बाजारपेठा, कपड्यांची दुकाने व किराणा दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली असून रात्री उशिरापर्यंत खरेदी सुरू असल्याचे दिसून येत आहे. ईदच्या स्वागतासाठी शहरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले असून रमजानच्या शेवटच्या दिवसांमध्ये धार्मिकतेसह आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‌.

Previous articleसुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळा चांदवडला थाटामाटात साजरा..
Next articleविद्यार्थ्याने अभ्यासात जिद्द, चिकाटी आणी सातत्य ठेवल्यास यश निश्चीत मिळते.