भूमीराजा प्रतिनिधी/संतोष मोरे
बाळापूर : पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर बाळापूर शहरातील नागरिकांनी नगर परिषद आणि महावितरण प्रशासनाकडे पाणीपुरवठा व वीजव्यवस्थेच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी जोरदार मागणी केली आहे. शहरातील इस्तामपुरा परिसरासह संपूर्ण बाळापूरमध्ये दूषित पाणीपुरवठा आणि वारंवार वीजखंडित होण्यामुळे नागरिक हैराण झाले असून, याबाबत प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रमजान महिन्यात उपवास (रोजा), धार्मिक विधी व स्वच्छतेला विशेष महत्त्व असल्याने स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा अत्यावश्यक आहे. मात्र सध्या शहरात येणारे पाणी दूषित, दुर्गंधीयुक्त व आरोग्यास धोकादायक असल्यामुळे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रमजानपूर्वी संपूर्ण शहरातील पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनची तातडीने स्वच्छता करून सुरळीत व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
त्याचबरोबर महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता यांनाही स्वतंत्र निवेदन देत शहरातील इलेक्ट्रिक डी.पी. (DP) व वीजवाहिन्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. सध्या अनेक भागांत तांत्रिक बिघाडामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, रमजान काळात यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत सर्व डी.पी. व वीजवाहिन्यांचे मेंटेनन्स पूर्ण करून अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.रमजानपूर्वी तातडीची कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून, प्रशासनाने या गंभीर विषयाची त्वरित दखल घेऊन जलद आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.




