Home कविता जुगार शेतीचा

जुगार शेतीचा

शेतकर्‍यांच्या हाती आलेलं
पीक जेव्हा वाहून जाईल
तेव्हा त्याची ही दिवाळी
कशी काय साजरी होईल

बारा महिने शेतात राबून
उसनवारी करून काय उरलं
परतीच्या पावसाने तर सारं
त्याच्या डोळ्यात पाणी आणलं

पाण्यासारखा ओतला पैसा
चार आणे उतरावेत म्हणून
त्यात भाव गेले मालाचे पडून
काय उपयोग आता सांगून

उत्पन्नापेक्षा खर्च झाला जास्त
कशी होईल आमची भरपाई
घरची सगळी माणसं शेतात
तरीपण शुन्यच झाली कमाई

आली दिवाळी आनंदाची तरी
आतून पसरला चिंतेचा अंधार
कशी फिटेल मग आमची बाकी
खेळतो नाव सांगून शेतीचा जूगार

धरलं तर चावते सोडलं तर पळते
अशी अवस्था झाली शेतकर्‍यांची
सांगताही येईना सोडताही येईना
फक्त नावाला शेती आहे म्हणायची

याला जुगार म्हणावं की व्यवसाय
हेच आता कोणीतरी खरं सांगावं
यापेक्षा अधिक तरी शेतकऱ्यांनी
काय बरं उपाय योजना करावी.

दत्ताहरी एकनाथराव कदम
मु. पो. मातुळ ता. भोकर
जि. नांदेड ९७६४९६१२४५

Previous articleजिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४१४ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर
Next articleदिपावली निमित्त नांदेड जिल्हा मध्यवर्ती बॅक शाखेला सि.ई.ओ अजय कदम यांनी दिली भेट….