खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दोन फेब्रुवारीला आंदोलनाचा इशारा
संदिप देवचे ग्रामीण पत्रकार 9860426674
जलंब : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सन 2026 साठी जाहीर केलेल्या थोर व्यक्तींच्या यादीतून जगगुरू संत तुकाराम महाराजांचे नाव वगळण्यात आल्याने राज्यभरातील वारकरी व संत समुदायात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयाविरोधात खामगाव येथे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
29 डिसेंबर रोजी शासनाने परिपत्रक काढून 40 थोर व्यक्तींचा समावेश असलेली यादी जाहीर केली. मात्र, महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सामाजिक आणि वैचारिक
जडणघडणीचे शिल्पकार असलेल्या संत तुकाराम महाराजांचे नाव या यादीत नसल्याने हा निर्णय संत परंपरेचा अपमान असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
संत तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धा, जातीय भेदभाव व अन्यायाविरोधात आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या अभंगांनी
चळवळ समाजप्रबोधनाची उभी राहिली. असे असताना शासनाने त्यांच्या कार्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप संत समुदायाने केला आहे.
या संदर्भात उपविभागीय अधिकारी, खामगाव यांना निवेदन देऊन तात्काळ निर्णय दुरुस्त करून संत तुकाराम महाराजांचे नाव यादीत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास 2 फेब्रुवारी रोजी संत तुकाराम महाराजांच्या जयंतीदिनी उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.




